राज्य शासनाचे अधिकारी परप्रांतीय ठेकेदारांना सामील, मंत्री उदय सामंतांचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:55 PM2022-05-02T13:55:23+5:302022-05-02T13:56:28+5:30
कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत.
सांगली : कामगार विभागातील अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना ताकद देत असल्याने स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. शिवसेना म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. प्रसंगी कामगारांच्या आंदोलन मी स्वत: उतरेन, असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.
कुपवाड येथील चाणक्य चौकात शिवसेनेच्यावतीने काल, रविवारी कामगार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. मेळाव्यास आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, बजरंग पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी भाषणातून राष्ट्रवादीकडे असलेल्या कामगार खात्याला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, कामगार खात्यातील अधिकारी हे कामगारांमध्ये आपसांत भांडणे लावतात. असे अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना मोठी ताकत देत असल्याचे दिसून आले आहे. मी कामगारमंत्री नसलो तरी शिवसेनेचा मंत्री म्हणून स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही. स्थानिकांच्या खच्चीकरणाची भूमिका ठेकेदारांनी घेतली आणि अधिकारी जर सामील असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही.
ते म्हणाले की, काही उपद्रवी लोकांचा उल्लेख याठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी येथील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. या गोष्टीत सर्व प्रश्नांची उत्तरे आली. काही लोकांचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्याची गरज नाही.
विद्यापीठ कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय
सामंत म्हणाले की, कामगार कायद्यानुसार कामगारांना जे कायदे लागू आहेत, ते सर्व कायदे यापुढे विद्यापीठातील सफाईकाम, माळी काम करणाऱ्या कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना लागू केले जातील. त्यामुळे त्यांना किमान वेतनही मिळणार आहे. येत्या १५ दिवसात हा निर्णय राज्यसरकार घेणार आहे.
१३ हजार कोटी खर्च करा
सामंत म्हणाले की, कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही हा निधी खर्च करायला लावू. तसे झाले तर राज्यातील संपूर्ण कामगार वर्ग कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील.
पंचनामे का नाहीत?
सामंत म्हणाले की, भोसे येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी मी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचे कळाले. ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.