सांगली : राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेवर मुंबई, पुण्याचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:33 PM2018-11-17T21:33:38+5:302018-11-17T21:37:06+5:30
चित्तथरारक चपळ कौशल्यांचे कठीण समीकरण जमवत मुंबई, पुण्याच्या पोरांनी राज्य शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेवर आपला वरचष्मा ठेवला.
सांगली : चित्तथरारक चपळ कौशल्यांचे कठीण समीकरण जमवत मुंबई, पुण्याच्या पोरांनी राज्य शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेवर आपला वरचष्मा ठेवला. यजमान कोल्हापूर विभाग मात्र अद्यापही पिछाडीवर आहे. नाशिक, औरंगाबाद विभागाचे खेळाडू जोराची लढत देत असून, ते मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. पुण्याच्या सिध्दांत कोंडेने ‘रोमन रिंग’, तर मुंबईच्या मानस मानकवळेने ’पॉमेल हॉर्स’वरील सुंदर प्रात्यक्षिके सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहेत. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या कसरती सादर करून राज्यभरातून आलेल्या मातब्बर खेळाडूंनी सांगलीकरांची मने जिंकली आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयामुळे स्पर्धेदरम्यान कोणताही वादाचा प्रसंग उद्भवला नाही. महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वयोगटातील विजेत्या खेळाडूंना बक्षिसे प्रदान केली जात आहेत.
स्पर्धेचा आजच्या दिवसाचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असा अंतिम निकाल :
वैयक्तिक साधन अंतिम विजेते : १४ वर्षे मुले : पॉमेल हॉर्स : मानस मानकवळे (मुंबई), आर्यन दवंडे (मुंबई), कुणाल अजबे (नाशिक). रोमन रिंग : सिध्दांत कोंडे (पुणे), मानस मानकवळे (मुंबई), आर्यन दवंडे (मुंबई). १४ वर्षे मुली : व्हाल्टींग टेबल : सलोनी दादरकर (मुंबई), रूजूल घोडके (मुंबई), रिया केळकर (पुणे). बॉलेन्सिंग बीम : उर्वी वाघ (पुणे), सलोनी दादरकर (मुंबई), देवयानी कोलते (औरंगाबाद). फ्लोअर : तन्वी कुलकर्णी (पुणे), अभा परब (मुंबई), रिया केळकर (पुणे).
वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद : १७ वर्षे मुले : मनीष गाढवे (मुंबई), युवराज लावंड (मुंबई), आदित्य प्रजापती (पुणे). १७ वर्षे : सांघिक विजेतेपद मुले : मुंबई (३१३), पुणे (२८०), नाशिक : (२३४). मुली : मुंबई (१९५), पुणे (१४०), औरंगाबाद (१३५). १९ वर्षे : वैयक्तिक विजेतेपद मुले : आदित्य फडणीस (मुंबई), कार्तिक पडाळकर (मुंबई), कबीर मुरूगकर (नाशिक). मुली : वैदेही देडलकर (मुंबई), दिया चोपडा (मुंबई), प्रणाली नळे (क्रीडा प्रबोधिनी). १९ वर्षे सांघिक विजेतेपद : मुले : मुंबई (३०१), पुणे (२१४), नाशिक (१८६). मुली : मुंबई (१८७), क्रीडा प्रबोधिनी (१५८), पुणे (१५०).