सांगलीत उद्यापासून राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन : शांतिनिकेतनला प्रथमच बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:30 PM2018-11-12T22:30:47+5:302018-11-12T22:34:20+5:30
शालेय राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे सांगलीत आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हरिपूर : शालेय राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे सांगलीत आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शांतिनिकेतन लोकविद्यापीठात या स्पर्धा होणार आहेत. १४, १७ व १९ वर्षे मुले, मुली गटात स्पर्धा होतील. आर्स्टिटिक, रिदमिक व आॅक्रोबॅटीक्स हे तिन्ही उपप्रकार एकाच छताखाली पार पडणार आहेत. त्यासाठी शांतिनिकेतनमध्ये सुसज्ज मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामध्ये तिन्ही प्रकारांचे क्रीडा साहित्य उपलब्ध केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शांतिनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होणार आहेत. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, क्रीडा प्रबोधिनी आदी विभागातून आठशे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शालेय राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धा सांगलीत प्रथमच होत असून, त्याचा बहुमान शांतिनिकेतनला मिळाला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन आ. अनिल बाबर यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी महापौर संगीता खोत, मनपा आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे नियोजन...
महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या पाचपेक्षा अधिक राज्यस्तरीय स्पर्धा शांतिनिकेतनने यशस्वी पार पाडल्या आहेत. शांतिनिकेतनकडे स्वत:चा सुसज्ज जिम्नॅस्टिक हॉल असून, त्यामध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे. शांतिनिकेतनचे प्रमुख गौतम पाटील स्वत: राष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू असल्याने जिम्नॅस्टिक खेळावर त्यांचे विशेष लक्ष असते. येणाऱ्या काळात राष्ट्रीय पातळीवरील जिम्नॅस्टिक स्पर्धा शांतिनिकेतनमध्ये यशस्वी करणार असल्याचे गौतम पाटील यांनी सांगितले.