राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून सांगलीत; उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
By अशोक डोंबाळे | Published: January 1, 2024 07:07 PM2024-01-01T19:07:38+5:302024-01-01T19:08:24+5:30
प्रशासनाकडून स्पर्धेची तयारी
सांगली : कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे ४ ते ७ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धांचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन बैठका चालू झाल्या आहेत.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन समितीची बैठक सांगलीत घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूरचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, आकाशवाणी सांगली कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, शेखर इनामदार, डॉ. प्रशांत इनामदार, नरेंद्रकुमार गाढवे, गजानन शेळके, हणमंत सरगर, देवेंद्र पाटील, प्रविण नंदगावे, गजानन मगदूम, एम. एस. आलासे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, बैठकीत स्पर्धा स्थळ व तारीख अंतिम करण्याबाबत चर्चा झाली. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, सामनाधिकारी, अधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. भोजन व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पाणी व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, बॅरिकेटींग, स्पर्धेसाठी आवश्यक स्टेज, मंडप, विद्युत व्यवस्थेचे संबंधितानी काटेकोर नियोजन करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
निधीचा प्रस्ताव तातडीने द्या : सुरेश खाडे
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी भाेजन व्यवस्था, खेळाडूंची निवास, स्टेज, मंडप, विद्युत व्यवस्थेसाठी किती निधीची गरज आहे. या सर्वांचा तातडीने प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करण्याची गरज आहे. तातडीने संबंधीत विभागाला निधी वर्ग करण्यात येईल, असेही पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले.