सांगलीत येत्या शनिवारपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, एक लाखाचे बक्षीस
By शीतल पाटील | Published: September 20, 2022 04:07 PM2022-09-20T16:07:51+5:302022-09-20T16:08:26+5:30
सुकाणू समितीकडून २५ संस्थांची निवड
सांगली: महापालिकेच्यावतीने स्व.मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा शनिवार २४ ते सोमवार २६ सप्टेंबरअखेर मिरजेतील बाल गंधर्व नाट्यगृहात होणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रूपये बक्षीस व मदनभाऊ महाकरंडक दिला जाणार आहे.
महापालिकेच्यावतीने काँग्रेसचे दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १२८ नाट्यसंस्थांनी नोंदणी केली होती. त्यातून सुकाणू समितीकडून २५ संस्थांची निवड करण्यात आली. शनिवारी सायंकाळी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर सोमवारी सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.
तीन दिवस चालणार्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज आदी शहरांतून नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. या एकांकिका स्पर्धा सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत सादर होणार आहेत. यामध्ये निवडलेल्या नाट्यसंस्था या महाराष्ट्रातील नावाजलेल्या आहेत. नाट्यसंस्थांसाठी रहाण्याची व जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आलेली आहे. एकवेळचा प्रवास खर्च देण्यात आलेला आहे.
प्रथम क्रमांकास एक लाख रूपये, द्वितीय क्रमांकास पन्नास हजार तर तृतीय क्रमांकासाठी पंचवीस हजार रोख बक्षीस दिले जाणार आहे. यासह दोन उत्तेजनार्थ पारितोषिके, दिग्दर्शक, प्रकाश योजना, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, पार्श्वसंगीत, उत्कृष्ट संहिता गटांमध्ये तीन बक्षीसे दिली जाणार असल्याचे महापौर सुर्यवंशी यांनी सांगितले. या वर्षीपासून महापालिका क्षेत्रातील जेष्ठ रंगकर्मींचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.