गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला ऑगस्टपासून अत्याधुनिक एलएचबी बोगी

By श्रीनिवास नागे | Published: May 19, 2023 03:41 PM2023-05-19T15:41:11+5:302023-05-19T15:41:40+5:30

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून धावणाऱ्या गाड्यांना जुन्या, निळ्या-पिवळ्य‍ा रंगातील आयसीएफ बोगी आहेत.

State-of-the-art LHB bogies for Goa-Nizamuddin Express from August | गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला ऑगस्टपासून अत्याधुनिक एलएचबी बोगी

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला ऑगस्टपासून अत्याधुनिक एलएचबी बोगी

googlenewsNext

मिरज : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला १ ऑगस्टपासून आरामदायी व अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडण्यात येणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेची चाैथी गाडी एलएचबी बोगीसह धावणार असून मध्य रेल्वेच्या गोंदिया, महालक्ष्मी, कोयनेसह नऊ एक्स्प्रेस एलएचबी कोचच्या प्रतीक्षेत आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून धावणाऱ्या गाड्यांना जुन्या, निळ्या-पिवळ्य‍ा रंगातील आयसीएफ बोगी आहेत. फाटलेल्या सीट, तुटलेल्या खिडक्या व स्वच्छतागृहाचे दरवाजे, बंद पंखे, गंजलेले दरवाजे, खिडक्या अशी जुन्या आयसीएफ कोचची अवस्था असल्याने प्रवास त्रासदायक ठरत आहे. रेल्वेने पाच वर्षापूर्वी या कोचची निर्मिती थांबवून नव्या अत्याधुनिक एलएचबी कोचची निर्मिती सुरू केली आहे. मात्र सध्या मध्य रेल्वेच्या पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ व दक्षिण कर्नाटकात धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या आयसीएफ बोगीसहच धावत आहेत. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मिरजेतून जाणाऱ्या जोधपूर, गांधीधाम, अजमेर, राणी चेन्नम्मा व आता गोवा एक्स्प्रेस एलएचबी कोचसह धावणार आहे.  

अशा आहेत नव्या बोगी

जुन्या आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) बोगीऐवजी नवीन लाल रंगातील एलएचबी (लिंक हॉफमन बुश) बोगी वजनाने हलक्या व जास्त उंच असल्याने रेल्वे ताशी दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावू शकते. आयसीएफ बोगींसह रेल्वे ११० किलोमीटर प्रतितास वेगानेच धावते. एलएचबी बोगी अपघातात उलटत नाहीत. स्टेनलेस स्टील व अ‍ॅल्युमिनिअम इंटीरियरसह बनलेल्या या बोगी वजनाने हलक्या व कमी आवाज करतात. नवीन बोगीत बायो-टॉयलेट, एसी बोगीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. स्मोक डिटेक्शन सिस्टिम असल्याने धावत्या रेल्वेत धूम्रपान अथवा आग लागल्यास तात्काळ सूचना मिळते. हायड्रॉलिक सस्पेंशन, डिस्क ब्रेक साइड सस्पेंशनमुळे प्रवास सुरक्षित व आरामदायी आहे. 

एलएचबी बोगीच्या प्रतीक्षेतील गाड्या 

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया, कोल्हापूर-मुंबई कोयना, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, पुद्देचरी-दादर, हुबळी-दादर, कोल्हापूर-कलबुर्गी. या गाड्यांना अद्याप जुन्या बोगी आहेत. त्यातील बैठक व्यवस्था नादुरुस्त आहे. स्लीपर बोगीतील सीट शिवलेल्या, चिटकवलेल्या आहेत. या जुन्या लोखंडी बोगी वजनदार असल्याने रेल्वेची गतीही मर्यादित आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या गाड्या एलएचबी बोगीत परावर्तित होत असताना मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

- सुकुमार चाैगुले, रेल्वे कृती समिती, मिरज

स्लिपरऐवजी तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगी

१ ऑगस्टपासून गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला एलएचबी बोगी जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर शयनयान (स्लिपर) बोगीची संख्या दहावरुन दोनवर येणार असून नऊ तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगी असणार आहेत.

Web Title: State-of-the-art LHB bogies for Goa-Nizamuddin Express from August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.