कोयना, महाराष्ट्र, नागपूर एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार; रेल्वे प्रवास आरामदायक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:52 PM2022-11-25T12:52:53+5:302022-11-25T12:53:18+5:30

एलएचबी कोचेस जोडताना साधारण डब्यांची संख्या ही वाढविण्याचीही मागणी केली जात आहे.

State of the art LHB bogies will be added to the Koyna, Maharashtra, Nagpur Express | कोयना, महाराष्ट्र, नागपूर एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार; रेल्वे प्रवास आरामदायक होणार

कोयना, महाराष्ट्र, नागपूर एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार; रेल्वे प्रवास आरामदायक होणार

Next

मिरज : मध्य रेल्वेतर्फे पुढील वर्षात सध्या सुरू असलेल्या काही एक्स्प्रेस गाड्यांच्या जुन्या बोगी बदलून नवीन अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार आहेत. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर- नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस व कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्यांना पूर्ण आरामदायक एलएचबी बोगी जोडणार असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.

कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांना साधारण डब्यातून प्रवास करणारे प्रवासी अधिक असल्याने दोन्ही एक्स्प्रेसला एलएचबी कोचेस जोडताना साधारण डब्यांची संख्या ही वाढविण्याचीही मागणी केली जात आहे. एलएचबी कोचेस आल्यामुळे या गाड्याच्या जनरल बोगींची संख्या ही कमी होणार आहे.

आयसीएफ व एलएचबी बोगीत फरक काय?

  • भारतीय रेल्वे पारंपरिक आयसीएफ डिझाईनच्या बोगीतून प्रवासी वाहतूक करते. हे डबे देशात बेंगळुरू व इतर ठिकाणी तयार होतात. या प्रकारच्या बोगींच्या, जास्त वजनामुऴे कमी गती, गंज, प्रवाशांना कमी आराम या मर्यादा आहेत.
  • यावर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने जर्मन कंपनीसोबत पुरवठा व तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला आहे. एलएचबी ही जर्मन कंपनी वातानुकूलित चेअर कार, द्वितीय श्रेणी वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह क्लास चेअर कार व जनरेटर कम ब्रेक व्हॅन असलेल्या बोगींचा रेल्वेला पुरवठा करणार आहे.
  • या बोगींची निर्मिती स्वित्झर्लंड येथे होणार आहे. एसी थ्री टियर बोगीत ६४ प्रवाशांच्या तुलनेत नवीन बोगीत ७२ प्रवासी बसू शकतात. एलएचबी कोचचे वजन जुन्या कोचच्या तुलनेत कमी असल्याने गती वाढवता येते. स्टेनलेस स्टीलचा वापर, उत्तम डिझाईनमुळे एलएचबी बोगीला गंज व देखभाल कमी आहे.
  • हे आधुनिक डबे मोठे व जास्त प्रवाशांना सामावून घेणारे आहेत. परंतु या गाड्यांना सध्या असलेल्या डब्यांची संख्या पाहता, नवीन एलएचबी डबे जोडल्यास प्रत्येक गाडीला दोन ते तीन डबे कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
     

समितीने केली सूचना

या गाड्यांच्या बोगींची डब्याची संख्या कमी न करता सध्या अस्तित्वात असलेल्या डब्यांच्या संख्याइतकेच नवीन एलएचबी डबे जोडण्यात यावेत, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व संदीप शिंदे यांनी केली आहे.

Web Title: State of the art LHB bogies will be added to the Koyna, Maharashtra, Nagpur Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.