इस्लामपुरात सोमवारपासून राज्य कला प्रदर्शन
By admin | Published: December 30, 2015 10:25 PM2015-12-30T22:25:17+5:302015-12-31T00:33:53+5:30
चित्र-शिल्पकृतींचा आविष्कार : सातशे कलाकृती; विविध कार्यक्रम
इस्लामपूर : राज्यभरातील कला महाविद्यालयांतील उदयोन्मुख कलाकार विद्यार्थ्यांची चित्रे आणि शिल्पकृतींचा आविष्कार इस्लामपूर येथे ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ५६व्या राज्य कला प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे. राज्याच्या कला संचालनालयाच्या वतीने सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन राजारामबापू चित्रकला महाविद्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती सांगलीच्या कलापुष्प संस्थेचे सचिव प्रा. बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. पाटील म्हणाले की, राज्यभरातील चार शासकीय व दोनशे अनुदानित-विनाअनुदानित कला महाविद्यालयांतील सातशे निवडक कलाकृतींची निवड केली आहे. येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात ४ जानेवारीस सायंकाळी पाचला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रमुख उपस्थित असतील.
प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा निमंत्रक आहेत. प्रदर्शनातून कलाकारांचे परिश्रम, त्यांची ताकद, कौशल्ये, तपश्चर्या पाहायला मिळेल. चित्र, शिल्प, धातीकाम, मातकाम, वस्त्रकला अशा विविध विभागातील सातशे कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. १0 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
ते म्हणाले की, उद्घाटनाच्या प्रमुख कार्यक्रमात पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिध्द कलाकार डॉ. नलिनी भागवत यांचा सत्कार होईल. ६ जानेवारीला सकाळी नऊ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव हे, चित्रे आकाराला कशी येतात याचे रहस्य उलगडून दाखवतील. याचदिवशी जिल्हा कलाध्यापक संघाच्या उद्बोधन वर्गाचे उद्घाटन होईल.
(प्रतिनिधी)