भाजप प्रदेशाध्यक्ष येत्या गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर, गटबाजीमुळे बावनकुळेंचीच कसोटी
By शीतल पाटील | Published: October 3, 2023 05:33 PM2023-10-03T17:33:25+5:302023-10-03T17:35:25+5:30
पक्षातर्गंत वादावर तोडगा निघणार?
सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेसाठी सांगलीची खेळपट्टी तयार करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार ५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भाजपमध्ये लोकसभा उमेदवारीवरून पक्षातंर्गंत गटबाजी उफाळून आली आहे. त्यावर बावनकुळे तोडगा काढणार का, याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सात ते आठ महिन्याचा कालावधी असला तरी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यपातळीवर नेत्यांचे दौरे आखले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरुवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही महिन्यापासून भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान खासदार संजय पाटील यांना पक्षातून आव्हान दिले जात आहेत.
पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही तयारी चालविली आहे. दोन्ही पाटलांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय वाद आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ते उफाळून आले आहेत. संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणावर टीका केली तर देशमुख यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आपली दिशा स्पष्ट केली. भविष्यात तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात देशमुख यांना आर. आर. पाटील गटाच्या मदत अपेक्षित आहे.
भाजपमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यात त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर-आटपाडी या विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष दिले. तेथील संघटनात्मक बांधणीचा ते आढावा घेणार आहेत. याशिवाय भाजप कोअर कमिटीची बैठकही होणार आहे. या बैठकीत भाजपमधील वाद मिटतील की आणखी चव्हाट्यावर येतील, याचीच उत्सुकता आहे.
तासगाव, मिरजेत आढावा बैठक
संजय पाटील यांच्या होमपीच असलेल्या तासगावातील आढावा बैठकीत पलूस कडेगावच्या कार्यकर्त्यांचा समावेश नाही. तर मिरजेतील बैठकीत देशमुख यांच्या होमग्राऊंडचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांच्या तालुक्यातील कार्यकर्ते एकाच बैठकीला उपस्थित राहून गोंधळ उडणार नाही, याची दक्षता भाजपने घेतली असल्याचे बोलले जाते.