राज्य शूटिंग बॉलचे कुपवाडला विजेतेपद
By admin | Published: January 20, 2015 11:11 PM2015-01-20T23:11:32+5:302015-01-20T23:49:59+5:30
राज्य महिला शूटिंग बॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला़ अनुभवी कुपवाडने बलाढ्य गोवा संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले़
सांगली : विद्युतझोताच्या प्रकाशाने सजलेले क्रीडांगण, जम्पशॉट, डिफेन्स व स्कोप आदी डावांची कौशल्यपूर्ण खेळी, बोचरी थंडी आणि प्रेक्षकांचा उदंड उत्साह अशा जोशपूर्ण वातावरणात राज्य महिला शूटिंग बॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला़ अनुभवी कुपवाडने बलाढ्य गोवा संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले़ रात्री आठ वाजता विद्युतझोतात गोवा विरुद्ध कुपवाड अशी अंतिम लढत झाली़ तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गोवा संघाने पहिल्या सत्रात कुपवाड संघाला धडकी भरवली़ चपळ, चाणाक्ष कुपवाड संघाने कौशल्यपूर्ण खेळाची रणनीती आखून गोव्याला जेरीस आणले़ १५-८ आणि १२-८ अशा सरळ सेटमध्ये गोव्याला नमवून कुपवाडने विजेतेपद आपल्या नावे केले़ विजेत्या कुपवाड संघात नीलिमा कोष्टी (कर्णधार), उज्ज्वला बाडगी, ममता तळगडे, अक्षता म्हेत्रे, राधिका शिंदे, सौज्ञा जगताप, स्नेहा हाक्के आदी खेळाडूंचा समावेश होता़ कुपवाडमधील देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा पार पडल्या़ प्रा. शरद पाटील स्पोर्टस् क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले होते़
विजेत्या संघांना माजी आ़ प्रा़ शरद पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ राजकुमार पवाळकर यांनी स्वागत केले़ यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर कोकरे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सचिव नरसगोंडा पाटील, माजी उपमहापौर मोहन जाधव, मुख्याध्यापिका ए़ पी़ फुटाणे, विठ्ठल खोत, नरसीभाई पटेल, अशोक रासकर, प्रमोद पाटील, रजनी कुंभार, शिवाजी कापसे, महादेव सरग, अश्विन पाटील, दत्ताजी जाधव, आदगोंडा गौंडाजे, बापू खांडेकर, शांतिनाथ पाटील, राजू खोत, संजय पाटील, आदी उपस्थित होते.