राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:14 PM2017-10-04T15:14:43+5:302017-10-04T15:19:10+5:30
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली, 4 : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला आहे. तसेच शासनाच्या या धोरणाविरोधात दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाघ पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना लगेच मुद्रांक मिळतात. ही शासनाची चुकीची पध्दत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात सध्या १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत.
नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे. जनतेला त्रास होत असल्यामुळे ते आम्हाला जाब विचारत आहेत. अनेकवेळा त्यांच्याशी संघर्षही करावा लागत आहे. यामुळे शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे त्याचे वाटप व्हावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई-चलन आणि ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावे, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना वारसाहक्काने परवाना मिळावा. एएसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.
पण, यावर त्यांनी कोणताच तोडगा काढला नाही. म्हणूनच दि. ९ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मोहन वाघ यांनी दिला आहे. आंदोलनाबाबत निवेदनही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.