तासगाव तालुक्यात राजकीय तणाव
By admin | Published: November 19, 2015 12:20 AM2015-11-19T00:20:37+5:302015-11-19T00:39:03+5:30
सरपंच निवडी : कौलगे, दहीवडी, सावळज, गव्हाणमध्ये वादावादी
तासगाव : तासगाव तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील १३ गावांत सरपंच निवडीवरुन अनेक गावांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या निवडीच्यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमने-सामने आले. कौलगे, दहीवडी, सावळज, गव्हाणमध्ये कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी तीन टप्प्यात पार पडल्या. तालुक्यात वर्चस्व कोणाचे, यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सरपंच निवडीसाठी रस्सीखेच सुरु होती. त्यामुळे तालुक्यातील सरपंच निवडीचा विषय कधी नव्हे इतका चर्चेचा आणि उत्सुकतेचा ठरला.
मंगळवारी कौलगे येथे सरपंच आणि उपसरपंच निवड झाली. याच निवडीवरुन मंगळवारी रात्री उशिरा दोन गटात बाचाबाची झाली. या घटनेनंतर कौलगेतील वातावरण तणावपूर्ण बनले. बुधवारी झालेल्या सरपंच निवडीवेळी दहीवडीतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटात सदस्यांच्या फोडाफोडीतून बाचाबाची झाली. तणाव वाढल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गव्हाण, सावळजमध्येदेखील सरपंच कोणाचा होणार? यावरुन तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. (वार्ताहर)