निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

By संतोष भिसे | Published: January 2, 2023 05:09 PM2023-01-02T17:09:15+5:302023-01-02T17:10:00+5:30

दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या

State wide strike by resident doctors, Healthcare disrupted in Sangli, Miraj | निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

googlenewsNext

सांगली : राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले. सांगली व मिरज रुग्णालयांतील डॉक्टरांनीही रुग्णसेवेकडे पाठ फिरविली. त्याचा अंशत: परिणाम रुग्णसेवेवर झाला.

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने संपाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील २५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्याचा प्रतिकूल परिणाम रुग्णसेवेवर झाला. डॉक्टरांनी सोमवारी सकाळी दोन्ही रुग्णालयांसमोर निदर्शने केली. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. संपामुळे बाह्यरुग्ण उपचार विभागात रुग्ण तपासण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. प्रशासनाने प्रशासकीय कामातील डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या. यामध्ये शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा, तातडीचा उपचार विभाग येथे डॉक्टर उपलब्ध होते, त्यामुळे आणिबाणीची स्थिती उद्भवली नाही. आंदोलन बेमुदत आहे, यादरम्यान, मार्डची शासनासोबतची चर्चा यशस्वी झाल्यास आंदोलन मागे घेतले जाईल असे मार्ड, मिरजचे अध्यक्ष डॉ. वरद देशमुख यांनी सांगितले. 

आंदोलनाचे नेतृत्व डॉ. देशमुख यांच्यासह दीपाली बुरकुले, वैभव खोब्रागडे, दीपाली नंदे, डिस्ने मॅथ्युज, राहुल गाडे, सतीश शिंदे, क्षितीज वाघ, मृगांक कदम आदींनी केले. 

मार्डच्या मागण्या अशा

विद्यार्थी वसतिगृहे तातडीने दुरुस्त करावीत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची १ हजार ४३२ पदे निर्माण करावीत, सहयोगी व सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, महागाई भत्ता लागू करावा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करावी.

Web Title: State wide strike by resident doctors, Healthcare disrupted in Sangli, Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.