अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा अखेर हलविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:48 PM2017-08-03T23:48:34+5:302017-08-03T23:48:38+5:30

The statue of Anna Bhau Sathe has finally moved | अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा अखेर हलविला

अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा अखेर हलविला

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील झुलेलाल चौकातील सिंधी समाजाच्या आयलँडमध्ये उभारण्यात आलेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा गुरुवारी राष्ट्र विकास सेनेने काढून घेतला. त्यानंतर अण्णा भाऊंच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. सिंधी समाजाने जागेचा ताबा घेत धार्मिक प्रतीक असलेल्या माशाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली. पुतळा हटविल्याने पोलिस व महापालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला असून, तणाव निवळला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिकेने सिंधी समाजाला मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौक सुशोभिकरणासाठी दिला आहे. सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, दोन दिवसांपूर्वी राष्ट्र विकास सेनेने या चौकात अचानक अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविला. पुतळा बसविताना सिंधी समाजाचे धार्मिक प्रतीक असलेल्या माशाची प्रतिकृती काढून ठेवली होती. त्याला सिंधी समाजाने विरोध केला होता. या समाजाने महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. त्यातच राष्ट्र विकास सेनेने अण्णा भाऊंचे स्मारक झाल्याशिवाय पुतळा हटविणार नाही, अशी भूमिका घेतली होती. बुधवारी महापालिकेत पुतळा हटविण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत महापालिकेने, टिंबर एरियात राष्ट्रपुरुषांचे स्मारक उभे केले जात असून, त्यात अण्णा भाऊंच्या पुतळ्याचाही समावेश करत असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्यावतीने स्मारक पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर झुलेलाल चौकातील पुतळा काढून घेण्याची तयारी राष्ट्र विकास सेनेने दर्शविली.
त्यानुसार सकाळी राष्ट्र विकास सेनेचे कार्यकर्ते झुलेलाल चौकात आले. पुतळा काढून घेतला जाणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. सिंधी समाजाचे लोकही जमले होते. राष्ट्र विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी झुलेलाल चौकात तटबंदी घालून पुतळा हटविण्याचे काम सुरू केले. अर्ध्या तासानंतर पुतळा काढून घेण्यात आला. यावेळी महापालिकेने दिलेल्या लेखी पत्राचे वाचन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी अण्णा भाऊंच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर त्यांचा पुतळा चांदीच्या रथात ठेवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, राष्ट्र विकास सेनेचे सुधाकर गायकवाड, आमोस मोरे, असिफ बावा, वर्षा काळे, आशा पवार, शाहरुख खतीब, सॅमसन तिवडे, रोहन कोळी यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी महापौर हारुण शिकलगार, पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके, नगरसेवक किशोर लाटणे, धनपाल खोत, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक शिवाजी खोत, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील उपस्थित होते.
पुतळा काढून घेतल्यानंतर सिंधी समाजाने धार्मिक प्रतीक असलेल्या माशाच्या प्रतिकृतीची पूर्ववत प्रतिष्ठापना केली. यावेळी सिंधी समाजाच्यावतीने श्री झुलेलाल यांचा जयघोष करण्यात आला. सिंधी समाजाचे हेमनदास पोपटाणी, गिरीश लोहाना, अनिल शंभवानी, हरिष पंजाबी, कवडीमल चावला, नंदलाल कुंदनानी, किशोर गंगवाणी यावेळी उपस्थित होते.
...तणाव निवळला
झुलेलाल चौकात अण्णा भाऊंचा पुतळा बसविल्याने शहरात तणावाचे वातावरण होते. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी यशस्वी मध्यस्थी करीत महापालिका व पोलिस प्रशासनासोबत तोडगा काढला. गुरुवारी सकाळी पुतळा हटवितानाही मोठा जनसमुदाय झुलेलाल चौकात जमला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात केला होता. अखेर पुतळा हटविल्याने साºयांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: The statue of Anna Bhau Sathe has finally moved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.