पोलीस असल्याचा बहाणा करून दागिने लंपास, विटा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:37 PM2022-09-26T12:37:09+5:302022-09-26T12:37:31+5:30
शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले असता तीन अनोळखी व्यक्तींनी लुटले
विटा : शेतात शेळ्या चारण्यास गेलेल्या शांताराम रामचंद्र भोसले (वय ५७) या सेंट्रिंग कामगाराचे ४२ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलीस असल्याचा बहाणा करून तिघा भामट्यांनी लंपास केले. ही घटना साेमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता विटा येथील कुंडल रस्त्यावर घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विटा येथील शांताराम भोसले हे सेंट्रिंग व्यवसाय करतात. दि १९ सप्टेंबर रोजी ते शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्याजवळ तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यापैकी दोघांनी ‘आम्ही पोलीस आहोत, तुम्ही एवढे सोने घालून कशाला फिरता’, असे म्हणत ‘तुमच्याकडे असलेले सर्व सोने आमच्याकडे द्या’, असे सांगितले. एकाने भोसले यांना पांढरा कागद देऊन त्या कागदावर सोने ठेवण्यास सांगितले.
यावर भोसले यांनी त्यांच्या हातातील साडेआठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व साडेआठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी असे सुमारे ४२ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना काढून दिले. हे दागिने हातात आल्यानंतर तिघा ठकसेनाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत शांताराम भोसले यांनी शनिवारी, दि. २४ रोजी विटा पोलिसांत फिर्याद दिली. निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.