मदनभाऊंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल
By admin | Published: April 14, 2017 11:09 PM2017-04-14T23:09:39+5:302017-04-14T23:09:39+5:30
जयश्रीताई पाटील : महापालिकेच्या ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन; सांगली, कुपवाडला स्वच्छ पाणी
सांगली : सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे मदन पाटील यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल महापालिकेने टाकले आहे. ५६ एमएलडी जलशद्धीकरण केंद्रामुळे दोन्ही शहरांना स्वच्छ पाणी मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी शुक्रवारी केले.
महापालिकेच्या माळबंगला येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन श्रीमती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते किशोर जामदार, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, धनपाल खोत यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या की, माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार वाढविण्यात आला आहे. आता ५६ एमएलडी पाणी शुद्ध होणार आहे. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ पाणी मिळेल. या दोन्ही शहरांसाठी मदन पाटील यांनी वारणा उद््भव योजना आणली होती. शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद सागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सुनीता खोत, माजी सभापती गुलजार पेंढारी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक पांडुरंग भिसे, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, अलका पवार आदी यावेळी उपस्थित होते. अभियंता अजित जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)