चोरलेल्या दुचाकीचे तासाभरात भंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 04:38 PM2020-01-20T16:38:33+5:302020-01-20T16:39:21+5:30
हॅन्डल लॉक न करता दुचाकी बाहेर लावताय? तर मग जरा सांभाळून! कदाचित चोवीस तासांतच ती कर्नाटकातल्या एखाद्या शहरात भंगार स्वरुपात दिसू शकते.
सांगली : हॅन्डल लॉक न करता दुचाकी बाहेर लावताय? तर मग जरा सांभाळून! कदाचित चोवीस तासांतच ती कर्नाटकातल्या एखाद्या शहरात भंगार स्वरुपात दिसू शकते.
सर्वसामान्यांना धक्का देणारी ही बातमी तितकीच चिंताजनकही आहे. गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा पुढील प्रवास कसा होतो, याचा तपशीलही तितकाच चिंताजनक आणि कल्पनेबाहेरचा आहे.
विशेषत: सांगली-मिरजेतून जाणाऱ्या दुचाकी कर्नाटकातील सीमेलगतच्या शहरांतील भंगार बाजारात चिरशांती घेताना पोलिसांना आढळल्या आहेत. कर्नाटक जवळच असल्याचा फायदा चोरटे उचलत आहेत.
सांगली-मिरजेतून चोरलेली दुचाकी तासाभरात अथणी, चिक्कोडीमध्ये पोहोचते. तेथील गॅरेजमध्ये तासाभरातच खोलून सुटे भाग तयार होतात. त्यानंतर तिची विल्हेवाट फार अवघड राहत नाही. पोलीस तपासात दुचाकी चोरीचा माग न लागण्याचे हे एक मुख्य कारण बनले आहे.
कर्नाटकातील काही शहरांत काही गॅरेजचालक आणि दुचाकी चोरट्यांचे संधानच असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. सुटे भाग हुबळीच्या मार्केटमध्ये सहज खपतात. काही गॅरेजमध्ये सुटे भाग स्वस्तात मिळण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हा चोरबाजार!
चेसीसवर टेम्परिंंगद्वारे म्हणजे गरम करुन नंबर बदलूनही दुचाकीची ओळख संपवली जाते. चेसीस गरम करून अन्य क्रमांकाचा शिक्का मारण्याचे उद्योगही विजापूर-हुबळीमध्ये चालतात. आरशापासून चाकापर्यंत आणि पेट्रोलच्या टाकीपासून चेनव्हिलपर्यंत सारेकाही या चोरबाजारांत मिळते.
अशाा चोरीच्या दुचाकींचा वापर चैनीसाठी, चोरीसाठी किंवा चेन स्नॅचिंगसाठीही वाढला आहे. अशा अनेक गाड्या कार्यभाग साधल्यानंतर बेवारस अवस्थेत सोडून दिल्या जातात. दुचाकी चोरीची तक्रार दिल्यानंतर, जरा म्हैसाळ-कागवाड किंवा अथणी रस्त्यावर फिरून या...असा अनुभवाचा सल्ला मुरलेला ठाणे अंमलदार देतो, त्याचे कारण हेच आहे. अनेकदा रस्त्यांकडेला बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या या दुचाकी सापडल्या आहेत.
एका प्रसिद्ध कंपनीच्या लोकप्रिय मॉडेलचे हॅन्डल लॉक एका फटक्यात तुटते. हेडलाईटखालचे वायरिंग तोडले की किकद्वारे दुचाकी सहज सुरु होते. गिअरमध्ये अडकवून हवी तेव्हा बंद करता येते. त्यामुळे तिच्या चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. चेन स्नॅचिंग करणाऱ्यांकडे हीच दुचाकी सर्रास आढळली आहे.