तासगावमधील महावितरणची मनमानी कारवाई थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:40+5:302021-04-02T04:26:40+5:30
तासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शासनाने केलेल्या लॉकडाऊन काळापासून अखंड महाराष्ट्रभर महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तासगावच्या ...
तासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शासनाने केलेल्या लॉकडाऊन काळापासून अखंड महाराष्ट्रभर महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील वीज बिले देऊन वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक दिला आहे, तो तातडीने कमी करण्यात यावा, कोणत्याही ग्राहकाचे थकीत वीज बिलापोटी कनेक्शन तोडू नये, अशी मागणी माहिती अधिकार, पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे तहसीलदारांकडे केली.
निवेदनात म्हटले की, मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत, महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करीत आहेत, ते तातडीने थांबवावे, मागील वर्षी कोरोनाची गंभीर परिस्थिती व लॉकडाऊनमुळे जनता हवालदिल झाली आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या व गंभीर परिस्थितीमुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे महावितरणची मनमानी पद्धतीने सुरू असलेली वीज बिलाची वसुली थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार, पोलीस मित्र फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रा. अविनाश कांबळे दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नलवडे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा सचिव संतोष शेवाळे आदी उपस्थित होते.