‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हवा सांगलीसह किर्लोस्करवाडीमध्ये थांबा; तिकीट विक्रीवर गाडीचे भवितव्य अवलंबून
By अविनाश कोळी | Published: November 4, 2023 02:12 PM2023-11-04T14:12:54+5:302023-11-04T14:13:12+5:30
अविनाश कोळी सांगली : कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असली तरी या आधुनिक ...
अविनाश कोळी
सांगली : कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असली तरी या आधुनिक गाडीचे भवितव्य तिकीट विक्रीवर अवलंबून आहे. कोल्हापूर, मिरज, साताऱ्यासह सांगली, किर्लोस्करवाडीलाही थांबा मिळाल्यास किमान ८० टक्क्यांवर तिकीट विक्री होऊ शकेल, अन्यथा अल्प काळात कमी तिकीट बुकिंगचे कारण देत ही गाडी बंद होऊ शकते, अशी भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सांगली रेल्वे स्टेशनवर ३२ ते ४० टक्के दैनंदिन एसी तिकिटे सांगली स्टेशनवरून बुक होतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सांगलीचा थांबा द्यावाच लागेल.
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून सुमारे तीनशे ते साडेतीनशे तिकिटे बुक होतील, असा विश्वास रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपला आहे. किर्लोस्करवाडी उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी रोज मुंबई, पुणे ते किर्लोस्करवाडी मार्गावर बस व कारने प्रवास करतात. हे लोक वंदे भारत रेल्वेने येऊ लागतील. तसेच, मुंबईतील बडे उद्योजकही मुंबई ते किर्लोस्करवाडी हा प्रवास ‘वंदे भारत’ने करतील.
नवीन सुरू होणाऱ्या भोपाळ-बंगळुरू या देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटना, सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय व डॉक्टरांच्या संघटना तसेच अन्य संघटना प्रयत्नशील आहेत.
सर्वाधिक एसी तिकीट विक्री सांगलीत
सध्याच्या कोल्हापूर-मुंबई मार्गावरील गाड्यांमध्ये महागड्या एसी फर्स्ट क्लास व एसी टू व एसी थ्री टीयरची कोल्हापूर पाठोपाठ सर्वाधिक तिकिटे सांगली स्थानकावरून बुक होतात.
पावसाळ्यात व आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी कोल्हापूर, सांगली व मिरज या तीन मुख्य रेल्वेस्थानकावरून कमी प्रवासी मिळतात, त्या दिवशी किर्लोस्कर कारखाना, हिंदुस्थान पेट्रोलियम सुरू असल्यामुळे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून जास्त प्रवासी मिळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. येथे एक्झिक्युटिव्ह क्लासच्या महाग तिकिटांची विक्रमी विक्री होईल. - डाॅ. चंद्रशेखर माने, रेल्वे अभ्यासक, पलूस तालुका
बऱ्याचदा नव्या गाड्या सुरू झाल्या व अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर त्या बंद केल्या जातात. वंदे भारत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना ती कमी तिकीट विक्रीच्या कारणास्तव बंद पडू नये, याची व्यवस्था अगोदरच करावी लागेल. त्यामुळे वंदे भारत गाडीला ८०-९० टक्के तिकीट विक्री होऊन ती चालू राहणेसाठी कोल्हापूर, मिरजेसह सांगली व किर्लोस्करवाडी हे दोन थांबे असणे महत्त्वाचे आहेत. - उमेश शाह, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप