सफाई कामगार भरती प्रक्रिया बंद पाडणार

By admin | Published: June 29, 2015 10:57 PM2015-06-29T22:57:25+5:302015-06-30T00:18:18+5:30

कुपवाडच्या नगरसेवकांचा इशारा : प्रभाग समिती तीनची बैठक

To stop cleaning the workers recruitment process | सफाई कामगार भरती प्रक्रिया बंद पाडणार

सफाई कामगार भरती प्रक्रिया बंद पाडणार

Next

कुपवाड : महापालिकेकडून सध्या राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विभागासाठीच्या कामगार भरती प्रक्रियेमध्ये प्रशासनाकडून कुपवाडवर अन्याय केला जात आहे. कामगार तुटवड्याप्रकरणी गरज असूनही आणि येथील नगरसेवकांनी आवाज उठवूनही काही बड्या पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी शहराला कमी कामगार दिले जाणार आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेत कुपवाडला सांगली, मिरजेप्रमाणे समान कामगार न मिळाल्यास ही कामगार भरती प्रक्रियाच बंद पाडणार असल्याचा इशारा प्रभाग समिती क्रमांक तीनच्या मासिक सभेत सोमवारी नगरसेवकांनी दिला.
सांगली, मिरजेच्या मानाने अविकसित असलेल्या कुपवाड शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी कामगारांची मोठ्याप्रमाणात गरज आहे. आरोग्य विभागाकडे १०५ कामगारांची मंजुरी असूनही अनेक कामगारांच्या गैरहजेरीमुळे स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नाहीत.
वीसहून अधिक कामगार सतत गैरहजर राहत असल्याचे समजले. हा कामगार तुटवडा लक्षात घेऊन नगरसेवक विष्णू माने, विजय घाडगे, शेडजी मोहिते यांनी स्थायी समितीच्या सभेत आवाज उठवून, कामगारांची भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी मान्य करून घेतली. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता कामगारांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मिरजेला, सांगलीला चाळीस आणि कुपवाडला फक्त सोळा कामगारांची भरती केली जाणार असल्याचे नगरसेवकांना समजले.
त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना सभेत चांगलेच धारेवर धरले. कुपवाडला कामगारांचे समान वाटप न झाल्यास आरोग्य विभागाची कामगार भरती प्रक्रियाच बंद पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याबरोबरच नगरसेविका निर्मला जगदाळे, धनपाल खोत यांनी कामगारांची कागदोपत्री बोगसगिरीही चव्हाट्यावर आणली.
या बैठकीस उपमहापौर प्रशांत पाटील, प्रभाग तीनच्या सभापती संगीता खोत, सहायक आयुक्त सी. बी. चौधरी, नगरसेविका सुरेखा कांबळे, गुलझार पेंढारी, रोहिणी पाटील, नगरसेवक संतोष पाटील, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, कोथळे, शहर अभियंता सी. जी. सोनवणे, कनिष्ठ अभियंता अशोक कुंभार, अस्लम जमादार, विद्युत अभियंता अमर चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

अधिकारी धारेवर
वीज दुरूस्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नगरसेवक गजानन मगदूम आणि विजय घाडगे यांनी जाब विचारला. या कामगाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. कुपवाडला जेसीबी न देता कागदोपत्री बिले खर्ची टाकली जात असल्याप्रकरणीही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी यापुढे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी नरमाईची भूमिका घेतली.

Web Title: To stop cleaning the workers recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.