कवठेमहांकाळ तालुक्यात कर्जवसुली थांबवा, अन्यथा आंदोलन : सागर लोंढे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:51+5:302021-05-12T04:26:51+5:30
शिरढोण : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून राज्यात लॉकडाऊन सुरू असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली ...
शिरढोण : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून राज्यात लॉकडाऊन सुरू असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच काही फायनान्स कंपन्यांकडून दमदाटी करून कर्जाची वसुली करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व फायनान्स व मायक्रो फायनान्स, महिला बचत गटातील फायनान्स यांचे हप्ते लॉकडाऊन काळात बंद करावेत, बँकांनी वसुलीसाठी तगादा लावून हप्ते गोळा करू नयेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर लोंढे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारकडून मे व जून महिन्यासाठी रेशन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोराेनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग २४ तास कार्यरत आहे. तिकडे विविध उपाययोजना करून नागरिकांना शासन दिलासा देत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विविध फायनान्स कंपन्या, बँका वसुली करण्यासाठी तगादा लावत आहेत. हप्ते न भरल्यास तुमचे रेकॉर्ड खराब केले जाईल, अशी भीती घालत दमदाटी करून हप्ते घेतले जात आहेत. ही वसुली न थांबविल्यास आंदाेलन करू, असा इशारा लाेंढे यांनी दिला आहे.