तासगावात बियाणे वाटप थांबवले
By admin | Published: June 25, 2015 10:54 PM2015-06-25T22:54:46+5:302015-06-25T22:54:46+5:30
मुदत संपलेला मका ‘महाबीज’ला पाठविणार : कृषी विभागाचा निर्णय; कारवाई होणार--लोकमतचा दणका
तासगाव : तासगावात कालबाह्य झालेल्या मका बियाणांची तसेच बेकायदेशीरपणे तणनाशकांची विक्री केल्याच्या प्रकरणाचा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिला. मुदत संपलेले मका बियाणे तालुका कृषी कार्यालयाकडून परत घेऊन ‘महाबीज’ कंपनीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही जमदाडे यांनी दिली.
गुरुवारी (दि. २५) ‘लोकमत’मध्ये ‘तासगावात कालबाह्य मका बियाणांचे वाटप’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीमुळे तालुक्यात खळबळ उडाली. कृषी विभागाकडून होत असलेल्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तालुका कृषी विभागाकडून मागील खरीप हंगामात १४ टन महाबीजचे मका बियाणे घेण्यात आले होते. या बियाणांची अनुदानावर विक्री करण्यात आली होती. मात्र यावर्षीदेखील मुदत संपलेल्या बियाणांची विक्री शेतकऱ्यांना करण्याचा प्रकार कृषी विभागाकडून होत होता. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर गुरुवारी बियाणे विक्रीचा प्रकार तात्काळ थांबविण्यात आला. दिवसभर कृषी विभागात तणावाचे वातावरण होते.
या बातमीची दखल घेत अधीक्षक कृषी अधिकारी जमदाडे यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठकदेखील बोलावली. या बैठकीत मागील हंगामात शिल्लक राहिलेल्या बियाणांचा आढावा घेण्यात आला. एका तासगाव तालुक्यात नऊ टन बियाणे शिल्लक राहिले होते. हे सर्व बियाणे कालबाह्य झाले आहे. त्यापैकीच काही बियाणांचे शेतकऱ्यांना प्रतिपिशवी २२० रुपये घेऊन वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांना वाटप केलेले बियाणे परत घेऊन ते बियाणे ‘महाबीज’ला परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिल्लक सर्व बियाणे शुक्रवारी सांगलीला घेऊन येण्याचे आदेश तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पैसे घेऊन तणनाशक वाटप झाल्याच्या प्रकाराबद्दल तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून, दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जमदाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
महाबीजचे विभागीय व्यवस्थापक आज सांगलीत
‘महाबीज’कडून मागील हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते. वाटप न झालेले, मुदत संपलेले बियाणे मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या गोदामात सडत आहे. हे बियाणे अद्याप महाबीजला परत करण्यात आलेले नाही. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यामुळे बियाणे परत करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात आला असून, हे बियाणे ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी महाबीजचे विभागीय व्यवस्थापक शुक्रवारी सांगलीत येणार आहेत. अन्य काही तालुक्यांतही मका बियाणे मोठ्या प्रमाणात शिल्लक असून शिल्लक बियाणांचा नेमका साठा किती आहे, हे महाबीजच्या ताब्यात बियाणे दिल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
तणनाशक विक्रीची माहितीच नाही!
तासगावच्या कृषी विभागात शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी आलेल्या तणनाशकांची तालुका कृषी कार्यालयातूनच शंभर रुपये घेऊन रोजरोसपणे विक्री होत होती. ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातमीनंतर हा सर्व प्रकार थांबला आहे. मात्र याबाबत आपणास माहितीच नसल्याचे तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी सांगितले. तणनाशकांचे वाटपच करण्यात आले नाही, असा खुलासा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला असल्याची माहिती शिरीष जमदाडे यांनी दिली. त्यामुळे कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नेमके सत्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतरच बाहेर येणार आहे.
वाटप केलेल्या बियाणांचे काय?
मुदत संपलेल्या बियाणांचे कृषी विभागाकडून वाटप करण्यात आले आहे. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर मका बियाणे महाबीजला परत पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आला. मात्र शेतकऱ्यांना वाटप केलेल्या मका बियाणांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बियाणे घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरणीदेखील केली आहे. त्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर कृषी विभागालाच द्यावे लागणार आहे.