दुष्काळ जाहीर करण्यासाठी जतला रास्ता रोको; चार तास वाहतूक विस्कळीत
By श्रीनिवास नागे | Published: July 15, 2023 05:21 PM2023-07-15T17:21:05+5:302023-07-15T17:21:35+5:30
काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग.
जत : दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी जत तालुका काँग्रेसच्या वतीने विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक चार तास खोळंबली. दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आमदार विक्रम सावंत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, अवकाळी आणि मान्सूनचा कोणताच पाऊस न झाल्यामुळे जत तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शासनाने त्वरित तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे. जत तालुका कायम दुष्काळी व अवर्षणप्रवण क्षेत्रात असून यंदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.
यंदा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी. खरीप पीक वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी. शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्व सवलती देण्यात द्याव्यात. सध्या तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन जत तालुक्याकरिता सुरू करून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
सुजय शिंदे, आप्पाराया बिराजदार, बसवराज बिराजदार, सरदार पाटील, नाथा पाटील, माणिक वाघमोडे, सलीम पाच्छापुरे, अशोक बननेवार, संतोष भोसले, युवराज निकम, नीलेश बामणे, तुकाराम माळी, दत्ता निकम, महादेव पाटील, बाबासाहेब माळी, भूपेंद्र कांबळे, बाळासाहेब तंगडी आंदोलनात सहभागी झाले होते.