पाणीप्रश्नी संघर्ष : कडेगावात संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:58 PM2018-11-15T16:58:34+5:302018-11-15T17:01:25+5:30
कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
कडेगाव : कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
कडेगाव येथील सामाजिक कार्यकते डी.ऐस. देशमुख व श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम केल्याने टेंभू योजनेचे सहाय्यक अभियंता नरेंद्र घार्गे यांनी आठ दिवसात कडेगाव तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात व अन्य मागण्या वरिष्ठापर्यंत पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले आणि आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
कडेगाव तालुक्यात चालूवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.पाण्याभावी खरीप वाया गेला आहे तर रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. कडेगाव शहरासह परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. पाणी नसल्याने उस व अन्य बागायती पिकेही वाळून चालली आहेत. टेंभू योजनेची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या उसबिलातून साखर कारखाने वसूल करतात व योजनेकडे भारतात तरीही योजनेचे पाणी मात्र मिळत नाही.
लाभक्षेत्रातील शेतजमिनीला टेंभू योजनेचे पुरेसे पाणी मिळावे तसेच सुरली कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे.शिवाजीनगर तलावाखालील कडेगाव शिवारातील शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे. भरलेल्या पाणीपट्टीच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाव्या अशा मागण्या आंदोलकांनी केल्या .यावर टेंभू योजनेचे साहाय्यक घार्गे यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.एस. देशमुख, श्रमिकमुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, शेतकरी संघटनेचे नेते युनुस पटेल, महेंद्र करांडे , संजय तडसरे, हाजी फिरोज बागवान , दीपक न्यायनीत यांची भाषणे झाली. यावेळी सुनील पवार, सुनील गाढवे , प्रकाश शिंदे , सिराज पटेल , दीपक शेडगे, अनिल देसाई , भरत माळी , राजाराम माळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.