डफळापुरात पाण्यासाठी रास्ता रोको --: ‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:33 PM2019-06-06T23:33:09+5:302019-06-06T23:33:48+5:30
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून मिरवाड (ता. जत) तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डफळापूर येथे डफळापूर व मिरवाडच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत
डफळापूर : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून मिरवाड (ता. जत) तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डफळापूर येथे डफळापूर व मिरवाडच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत जत-सांगली रस्ता दोन तास रोखून धरला. शेतकरी शेळ्या-मेंढ्या, बैलगाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकºयांचा उद्रेक होईल म्हणून प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बाचाबाची वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
मिरवाड येथील शेतकºयांंनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून पाणी मिळावे म्हणून फेब्रुवारीत योजनेकडे पाच लाख रुपये भरले होते, पण पाणी मिळाले नाही. याच्या निंषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोकोसाठी सकाळी साडेदहा वाजता शेतकरी बसस्थानक परिसरात जमू लागले. डफळापूर व मिरवाड येथील शेतकºयांनी प्रथम डफळापूर गावातून मोर्चा काढला. हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सचिव दिगंबर कांबळे, शेतकरी संघटना कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष हणमंत कांबळे, विजय चव्हाण, अशोक सवदे, सिध्दू गावडे, संजय भोसले, आण्णाप्पा चव्हाण, अतुल शिंदे, गौस मकानदार, अंबादास कुंभार सहभागी झाले होते.
हा मोर्चा बाजारपेठेतून मुख्य चौकात आला. जत-सांगली रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शेकडो शेतकरी रस्त्यावर बसले. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी देवनाळ कालव्याचे कनिष्ठ अभियंता सी. एल. मिरजकर आंदोलनस्थळी आले. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शेतकºयांनी त्यांना जाब विचारत घेराव घातला. महेश खराडे व मिरजकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.दरम्यान, आंदोलकांनी अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. कनिष्ठ अभियंता मिरजकर यांनी मिरवाड तलावात येत्या १२ तारखेला पाणी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाला पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, जिरग्याळचे सरपंच दीपक लंगोटे, विक्रम ढोणे, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागर चव्हाण, कुडणूरचे माजी सरपंच अज्ञान पांढरे, मराठा स्वराज संघ जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड, नंदू कट्टीकर, मनोहर भोसले, दत्त पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब माळी आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
सांगलीत आज बैठक
देवनाळ कालव्यातून जोपर्यंत मिरवाड तलावात पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत पुढे बिळूरला आम्ही पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार शेतकºयांनी केला.मिरवाड तलावात पाणी सोडण्याबाबत शुक्रवार दि. ७ रोजी वारणाली, सांगली येथे बैठकीसाठी येथील शेतकºयांना बोलाविण्यात आले आहे.आंदोलन तीव्र होत असताना, आलेल्या दोन रुग्णवाहिकांना शेतकºयांनी मार्ग मोकळा करून दिला.
दुष्काळप्रश्नी १२ जूननंतर तीव्र आंदोलन
डफळापूर येथे आंदोलनात शेकडो शेतकरी शेळ्या-मेंढ्या, बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते. बारा तारखेपर्यंत मिरवाड तलावात पाणी न सोडल्यास १२ जून रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.
डफळापूर (ता. जत) येथे शेतकऱ्यांनी मिरवाडी तलावात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळावे, या मागणीसाठी जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.