उमदीत कडकडीत बंद, निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:48 PM2017-08-06T23:48:37+5:302017-08-06T23:48:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
उमदी : प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. याचा निषेध करीत स्वतंत्र उमदी तालुका व अप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, या मागणीसाठी रविवारी उमदी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रविवारचा आठवड बाजारही बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला. सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी उमदी बसस्थानक चौकात एकत्र येऊन टायर पेटवून शासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.
जत तालुक्यातील सर्व गावांना अंधारात ठेवून संख येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला उमदीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याशिवाय १२३ गावे व वाड्या-वस्त्या असलेला जत तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याचे विभाजन करून नवीन दोन तालुके करता येणे शक्य आहे, मात्र प्रशासन चुकीचे निर्णय घेऊन वाद मिटविण्याऐवजी वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. जत तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र उमदी तालुका व्हावा, तसेच उप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रविवारी सकाळपासूनच उमदीतील सर्व व्यवहार बंद होते. आठवडा बाजारही भरला नाही. परिणामी बाहेरगावहून आलेल्या बाजारकरूंची गैरसोय झाली. सकाळी उमदी बसस्थानक चौकात ग्रामस्थ एकत्र आले. टायर पेटवून देऊन शासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांनी पक्ष, संघटना, मतभेद बाजूला ठेवून उमदी तालुक्यासाठी एकत्र लढा उभारण्याचा निर्धार केला.
यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र उमदी तालुक्यासाठी कृती समिती प्रयत्न करीत आहे. पूर्व भागातील ग्रामस्थांच्या सोयीचे ठिकाण उमदी आहे. संख व उमदी या गावात धार्मिक परंपरेमुळे कोणतेही व्यवहार होत नाहीत. याची माहिती असूनही संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करून प्रशासन नवीन वाद निर्माण करीत आहे. तातडीने हा निर्णय थांबवावा.
माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले, उमदीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा व ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे. अन्यथा तीव्र लढा उभारू. आज दुकाने व बाजार बंद ठेवून निषेध नोंदवित आहोत. वेळप्रसंगी तालुका व जिल्हा मार्गही बंद ठेवण्याची आमची तयारी आहे. तेव्हा प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला.
निवृत्ती शिंदे म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून आम्ही उमदी तालुक्यासाठी संघर्ष करीत आहोत. जत तालुक्याचे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके करण्यात कोणतीही अडचण नाही. तरीही दिशाभूल करून संख व उमदी असा नवीन वाद निर्माण करण्याचा राजकीय डाव सुरू आहे. मात्र उमदीकरांच्या भावना तीव्र आहेत. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये.
यावेळी सरपंच सावित्री होर्तीकर, उपसरपंच निसारभाई मुल्ला, सुरेश कुल्लोळी, बंडोपंत शेवाळे, मानसिध्दा पुजारी, रमेश हाक्के, मल्लू सालुटगी, धोंडीराम शिंदे यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.
बाजारकरूंची गैरसोय
उमदीसह तेरा गावांच्या सोयीचा असणारा उमदीचा आठवडा बाजार रविवारी बंद होता. यामुळे बाजारकरूंची गैरसोय झाली. उमदीचा आठवडा बाजार हा परिसरातील सर्वात मोठा बाजार असल्याने व्यापाºयांचाही खोळंबा झाला. मात्र अप्पर तहसील कार्यालयाबाबत उमदीकरांच्या भावना तीव्र असल्याने सर्वांनीच आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.