दुतोंडी विचार थांबवा : कल्पनाराजे
By admin | Published: January 21, 2015 11:00 PM2015-01-21T23:00:03+5:302015-01-21T23:56:52+5:30
शिवेंद्रसिंहराजेंना टोला : कास उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रथम उदयनराजेंनीच मांडल्याचे ठणकावले
सातारा : ‘कासची उंची वाढविण्याची संकल्पना सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे. त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव २००२ मध्ये पालिकेच्या पूर्ण सत्ता काळात पाठविला. काही लोक कास उंची वाढविण्याचे सर्व प्रयत्न आपणच करीत असल्याचे बेगडी तंत्र बैठका व टेबलमेड बातम्या पसरवून भासवत आहेत,’ असा टोला कल्पनाराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी जलसंपदा विभागात बैठक घेऊन कास धरणाची उंची तातडीने वाढवावी, अशा सूचना केल्या होत्या. तसेच कास धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले असल्याचे प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर बुधवारी कल्पनाराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे खरपूस टीका झोडली आहे.
कल्पनाराजे म्हणाल्या, ‘कास धरणाची उंची वाढविण्याचे काम फक्त एका कोणा लोकप्रतिनिधीमार्फत होत असल्याचे भासविले जात आहे. वास्तविक, कास उंचीच्या प्रस्तावाला आवश्यक असणारी वनजमीन ताब्यात घेण्याच्या समस्यांचा विचार करता ही जटील समस्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळेच सोडवली गेली आहे. उदयनराजेंनी पाठपुरावा केला नसता तर अजून दहा वर्षे वनजमीन ताब्यात मिळाली नसती. कासची उंची वाढविण्याचा प्रस्ताव खासदार उदयनराजेंनी दिला. त्याला बालीशपणा म्हटला. कण्हेरची ग्रॅव्हिटीची बिनखर्चाची, कमी खर्चाची योजना उदयनराजेंनी मांडली. तुम्ही ती सत्तेच्या जोरावर बासनात गुंडाळून साखर कारखान्याला लाभ होणार, अत्यंत महागडी शाहापूर योजना सातारकरांवर लादली. आज शाहापूर योजनेच्या वीजबिलांचा प्रचंड भुर्दंड पालिकेवर पर्यायाने सातारकरांवर पडला आहे. कास बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत प्रतापसिंह महाराज यांनी नगराध्यक्ष असताना मांडली; पण ती योजना उदयनराजे भोसले हे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व नंतर महसूल मंत्री असतानाच्या काळात उदयनराजेंनी मंजूर करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. सातारकरांविषयी इतके प्रेम तुम्हाला असते, तर १९७५-७६ पासून उदयनराजे महसूल मंत्री होईपर्यंत म्हणजेच १९९७-९८ पर्यंत पूर्ण सत्ता आणि विविध मंत्रिपदे संबंधितांकडे असतानाही कासची बंदिस्त पाईपलाईन का होऊ शकली नाही, हे उघड गुपित सातारकरांना माहिती आहे,’ असाही टोला कल्पनाराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लगावला. (प्रतिनिधी)
श्रेय कशाचे घेताय?
कण्हेर उद्भव, कास बंदिस्त पाईपलाईन, केंद्र शासनाची घरकूल योजना, कासचा गाळ काढणे, कोंडवे हे आदर्श संसद ग्राम जाहीर केल्यावर येथील रस्त्यांची कामे या व अशा अनेक विषयांच्या माध्यमातून मी केले, आमक्याचे स्वप्न होते, अशा प्रकारच्या गोंडस वाक्यांचा आधार घेत श्रेय घेणाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या कामाबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.