‘एफआरपी’साठी रास्ता रोको
By admin | Published: January 16, 2015 11:29 PM2015-01-16T23:29:54+5:302015-01-16T23:41:49+5:30
पलूसमध्ये आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पलूस : ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज, शुक्रवारी पलूसच्या मध्यवर्ती चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला.संघटनेचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा व पलूस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपट मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी राजोबा म्हणाले की, चालू हंगामात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने हे आंदोलन सुरू आहे. चालू हंगामात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देता प्रती टन १ हजार ९०० रुपये दर जाहीर केला आहे.
त्या दराप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी-प्रमाणे दर द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहोत.
पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने ऊस पीक घेतले आहे. परंतु साखरसम्राटांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर न देता प्रतिटन १ हजार ९०० रुपये देण्याची घोषणा करीत त्याप्रमाणे रक्कम देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास आता जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यक्षेत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करणार असल्याचे संदीप राजोबा म्हणाले.
पलूस तालुका अध्यक्ष महावीर पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष राजू माने, महावीर पाटील, पोपट मोरे, अधिक जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
आंदोलन आणि परीक्षा
रास्ता रोकोमुळे एसटी थांबली होती. त्यामध्ये एक महाविद्यालयीन विद्यार्थी सांगलीला परीक्षेसाठी जाणार होता. त्याने अनेकवेळा एसटी सोडा, माझी परीक्षा आहे, अशी विनंती केली. अखेर संदीप राजोबा यांनी त्याला पैसे देऊन परीक्षेसाठी दुसऱ्या गाडीने पाठविले.