मुंबईतून विनापरवाना येणाऱ्या पोलिसांना रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:54 AM2020-04-30T05:54:19+5:302020-04-30T05:54:30+5:30
या सर्वांना पुन्हा मुंबईकडे रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, पोलीस नाईक संतोष किसन जाधव, हर्षदा संतोष जाधव व मोहिनी रवी जाधव अशी त्यांची नावे आहेत.
कासेगाव (जि. सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यास बंदी असताना खासगी वाहनातून विनापरवाना मुंबईहून सांगलीकडे येत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कासेगाव पोलिसांनी बुधवारी पाठलाग करून पकडले. याप्रकरणी कासेगाव पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या सर्वांना पुन्हा मुंबईकडे रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, पोलीस नाईक संतोष किसन जाधव, हर्षदा संतोष जाधव व मोहिनी रवी जाधव अशी त्यांची नावे आहेत.
बुधवारी पहाटे पाच वाजता महामार्गावरील कासेगाव चेकपोस्टवर कासेगाव पोलिसांचे पथक कार्यरत होते. यावेळी मुंबईहून सांगलीकडे निघालेली मोटार (क्र. एमएच ४८ एपी ४८३१) चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना न जुमानता मोटार गतीने सांगलीच्या दिशेने निघाली. कासेगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने मोटारीचा पाठलाग सुरू केला. शेवटी नेर्ले (ता. वाळवा) येथे महामार्गावरच पोलिसांची जीप आडवी मारून ही मोटार थांबवण्यात आली. मोटारीतून मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, वरळी वाहतूक विभागाकडील पोलीस नाईक संतोष जाधव व त्यांच्या कुटुंबातील हर्षदा जाधव व मोहिनी जाधव हे सर्वजण सांगलीस येत होते.
मोटार अडवल्यानंतर कासेगाव पोलीस आणि मुंबईहून येणाºया पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. ‘घरातील व्यक्ती आजारी आहे, म्हणून आम्ही आलो आहोत’, असे ते वारंवार सांगत होते.