घोंगावणारं वादळ अखेर भिलारमध्ये विसावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:15 AM2017-07-20T00:15:38+5:302017-07-20T00:15:38+5:30

घोंगावणारं वादळ अखेर भिलारमध्ये विसावलं

The storm that exploded finally remained in Bhilar | घोंगावणारं वादळ अखेर भिलारमध्ये विसावलं

घोंगावणारं वादळ अखेर भिलारमध्ये विसावलं

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी दुर्गम महाबळेश्वर तालुक्यात आपल्या सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केला. स्वातंत्र्यपूर्व काळात सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:ला विद्यादानाच्या कार्यात झोकून दिले. सर्वत्र स्वांतत्र्यप्राप्तीची चळवळ वेग घेत असताना गुरुजी महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झाले. ऐन तारुण्यात गुरुजींच्या मनात क्रांतीची ज्योत पेटत होती. त्यांच्या निधनानंतर जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. गुरूजींसारखा सर्वसामान्य सातारकरांच्या मनात वसलेला ज्येष्ठतम नागरिक अन् घोंगावणारं वादळ आज भिलारच्या मातीतच विसावलं, अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
लोकमान्य टिळकांच्या निधनांनंतर काँग्रेसला आणि देशाला महात्मा गांधीजींचे नेतृत्व मिळाले. त्यामुळे गांधीजींनी देशातील तरुण वर्गाला स्वातंत्र चळवळीमध्ये उडी घेण्याचे आवाहन केल्यानंतर भिलारे गुरुजींनी शिक्षकाच्या नोकरीचा त्याग करून स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. या काळात त्यांनी सायकलवरून भिलार ते मुंबई असा दोनवेळा खडतर प्रवास करून दुर्गम भागात बुलेटीन वाटली. या काळात महात्मा गांधीजींचे निष्ठांवत पाईक व दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे ते सच्चे अनुयायी होते. तसेच दिवंगत आबासाहेब वीर यांचे ते विश्वासू सहकारी होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना भिलारे गुरुजींना महात्मा गांधीजी, थोर नेते वल्लभभाई पटेल, सरहद्द गांधी, राजगोपालाचारी, साने गुरुजी, देशभक्त आबासाहेब वीर, पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे, शंकरराव देव, अच्युतराव पटवर्धन अशा महान विभूतींचा सहवास लाभला. या सहवासामुळे गुरुजींना सहकार शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.
वाड्या-वस्त्यांमधील लोकांना सहन कराव्या लागत असलेल्या हालअपेष्टा गुरुजींनी जवळून पहिल्या त्यामुळेच त्यांनी महाबळेश्वर, जावळी भागातील गावांच्या उन्नतीसाठी ग्रामोन्नती संघाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा व अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सक्रिय सभासद ते जिल्हाध्यक्ष असा त्यांनी प्रवास केला होता. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकांमध्ये भिलारे गुरुजींचे नाव आजही आदराने घेतले जाते.
शिक्षक ते आमदार एक अविस्मरणीय प्रवास
भि. दा. भिलारे गुरुजी यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार (ता. महाबळेश्वर) येथे शेतकरी कुटुंबात झाला.
त्यांचे बालवाडी ते सातवी पर्यंतचे शिक्षण १९२८ ते १९३६ या कालावधीत भिलार, पाचगणी व महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेत झाले.
१९३७ ते १९४३ या कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी पाचगणी, सुरूर, महाबळेश्वर येथे सेवा बजावली.
१९४८ ते १९५२ या कालावधीत ते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी सदस्य होते.
१९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळीचे आमदार होते. १९७८ ते १९८० या कालवधीत त्यांनी विधानसभेचे सदस्यपद भूषविले. महाराष्ट्र राज्य प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते ४० वर्षे सदस्य होते.
१९८४ मध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सदस्य, १९८८ ते १९९४ मध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, १९९१ ते १९९४ या कालावधीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, १८८९ ते १९९४ या कालावधीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, १९९१ ते १९९५ मध्ये ते सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिक गौरव समिती अध्यक्ष होते. १९९२ मध्ये भिलारे गुरुजींनी आॅगस्ट क्रांती सुवर्णमहोत्सव समितीचे सातारा जिल्हा संयोजक म्हणूनही काम पाहिले.
३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित नेहरूंना झालेला विरोध रोखण्यात किसन वीर, यशंवतराव चव्हाण यांना गुरुजींनी तोलामोलाची साथ दिली होती. या कार्यक्रमात नेहरूंचे सुताचा हार घालून स्वागत करण्याचा बहुमान गुरुजींना मिळाला होता. ‘हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’ असल्याचे गुरुजी नेहमी आवर्जून सांगत असत.

Web Title: The storm that exploded finally remained in Bhilar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.