पेठनाक्यावरील वादळ महामार्गावरच शमले!
By admin | Published: October 1, 2014 11:00 PM2014-10-01T23:00:58+5:302014-10-02T00:17:34+5:30
महाडिक गटाची माघार : इस्लामपूर मतदारसंघात चर्चा
अशोक पाटील -- इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक आणि त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक यांनी पहिल्या टप्प्यात दंड थोपटले होते; तर शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी ताकद दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात पेठनाक्याचा दबदबा वाढला होता. परंतु अर्ज माघारीदिवशी दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेत महाडिक गटाने लढण्यापूर्वी निवडणुकीतून एक्झिट घेतल्याचे स्पष्ट झाले. पेठनाक्यावरील वादळ महामार्गावरच शमल्याने आता इस्लामपूर मतदारसंघात सर्व काही शांत राहणार आहे.
सहा महिन्यांपासून नानासाहेब महाडिक आणि राहुल, सम्राट महाडिक यांनी कसल्याही परिस्थितीत जयंत पाटील यांना आव्हान द्यायचेच, असा निर्धार करून मतदारसंघात चाचपणी सुरू केली होती. या तिघांनीही इस्लामपूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. नानासाहेब महाडिक यांच्या रूपाने जयंत पाटील यांना तगडे आव्हान मिळेल, अशी चर्चा होती. खासदार राजू शेट्टी यांनीही महाडिक यांना पसंती देऊन सर्व ती मदत करण्याची तयारी दर्शवली होती.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच नानासाहेब महाडिक यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले होते. यासाठी त्यांनी मातोश्रीवर ठिय्या मारला होता. परंतु शेवटपर्यंत त्यांच्या तिकिटाचा निर्णय न झाल्याने हताश होऊन परतावे लागले होते. त्यानंतर महाडिक पिता-पुत्रांनी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच काँग्रेसच्यावतीने जितेंद्र पाटील, शिवसेनेतर्फे भीमराव माने, अपक्ष म्हणून अभिजित पाटील, बी. जी. पाटील यांनीही अर्ज दाखल करून एकास एक उमेदवार देण्याच्या प्रक्रियेला खो घातला. त्यामुळे महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेणे पसंत केल्याचे सांगितले जाते.
निवडणुकीतील चुरस कमी
नेहमी शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असणाऱ्या नानासाहेब महाडिक यांनी गत निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती, तर इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांना सहकार्याची भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेचा शब्द देऊन चकवले होते. याचा राग मनात ठेवून यावेळची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या महाडिक यांनी लढाईवेळी तलवार म्यान करून निवडणुकीतील रंगत कमी केली आहे. दरम्यान, शिराळा मतदारसंघातील सम्राट महाडिक यांचाही अर्ज मागे घेण्यात आला आहे. ते आता कोणाला मदत करणार, याकडे शिराळा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.