वादळी नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:10+5:302021-05-11T04:27:10+5:30
पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या ...
पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा वाढवून गेला. आजही या पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी केला जाणारा जागर युवा पिढीला ताकद देत आहे.
नानासाहेब महाडिक जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना ताकद देत. त्यामुळे राज्य पातळीच्या नेत्यांपासून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण पेठनाक्यावरून जाताना नानांचे पाठबळ घेतल्याशिवाय कोल्हापूर, सांगलीकडे प्रयाण करत नव्हते. त्यांचे पाठबळ म्हणजे विजय, हे राजकीय समीकरण सांगली जिल्ह्यात स्थिरावले असतानाच त्यांचे अचानक निधन झाले आणि जिल्ह्यातील राजकारणात पोकळी निर्माण झाली.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंडखोरी करून लढविलेल्या विधान परिषदेच्या दोन निवडणुका त्यांच्या जीवनातल्या राजकारणातल्या धाडसी आठवणी ठरल्या आहेत. दिलेला शब्द पाळणे, हे त्यांचे गुणवैशिष्ट्य सर्वसामान्य जनतेत रुजले होता. त्यांच्या दारी गेलेला कोणीही भरल्या हाताने आणि आठवणीनेच परतत होता. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत नाना हे राजकीय सल्ल्याचे विद्यापीठ होते. सांगलीतील वसंतदादा घराण्यातील राजकारणाला शिस्त लावण्याचे काम त्यांनीच केले.
कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील महाडिक घराण्याचे राजकारण पेठनाक्यावरील ‘नाना महाडिक पॅटर्न’शिवाय पुढे सरकत नव्हते. आता त्यांची उणीव भासू लागली आहे. मुळातच त्यांच्या रक्तात देशसेवेचा सैनिकी बाणा होता. त्यामुळे निवृत्त सैनिकांंच्या संघटनेचे ते आधारस्तंभ होते. पैलवानकी पेशा असल्याने नानांना कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पैलवान वस्तादांचा मान देऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय मैदानाला जात नसत. आज बदलत्या राजकीय समीकरणांत त्यांच्या कार्यकर्त्यांना नानांची आठवण पदोपदी येते. नानांचा विचार घेऊन महाडिक युवा शक्ती भविष्यातील राजकारणाचा वेध घेत आहे.
अशोक पाटील, प्रतिनिधी