बंडोबांच्या गळाची कहाणी

By admin | Published: October 2, 2014 09:43 PM2014-10-02T21:43:18+5:302014-10-02T22:24:10+5:30

सांगली--सरकारनामा

The story of Bandoba's throat | बंडोबांच्या गळाची कहाणी

बंडोबांच्या गळाची कहाणी

Next


बंडोबांनी दसऱ्याच्या तोंडावर दवंडी देऊन गावभर गलबला केल्यानं तमाम साहेब, भाऊ, काका, आबा, अण्णा, दादांची ‘सटकली’ होती. ही सटकलेली मंडळी मागं लागणार असल्यानं (आणि सोनं घेऊन मागं लागावीत यासाठीही!) समस्त बंडोबा सावध होते. काहीजण गळ टाकून बसले होते, तर काहीजण मुद्दाम मोबाईल समोरच ठेवून बसले होते. (हो! कधी नव्हे ते ‘तिकडून’ फोन यायचा आणि आपल्याला नेहमीसारखं उचलायचंं न कळल्यानं दारी आलेली लक्ष्मी परत जायची!)
राजोबांच्या संदीपनं ब्रह्मनाळला कृष्णा-येरळेच्या संगमावर गळ टाकला होता. नंतर वाट बघून-बघून कंटाळल्यानं दाढीत बोटं खुपसून येरळेच्या वाळूत (पाण्यात नव्हे) बसला. बाबा-काकांच्या गाडीची, राजूभार्इंच्या निरोपाची प्रतीक्षा होती. होतंय का नाही, या विवंचनेत ‘गॅस’वर होता बिचारा! पण शेवटपर्यंत कुणीच आलं नाही. कुणी म्हणतंय ‘त्यानं गळ टाकून दिला’... कुणी म्हणतंय ‘वाळूवाल्यांच्या गाड्या काल तिथं फिरत होत्या’... तर कुणी म्हणतंय ‘चारचाकीवर त्याची बोळवण करण्यात आलीय, तरीही ऐकंना म्हटल्यावर राजूभार्इंनी नाद सोडून दिलाय.’
जतच्या तलावाचं पाणी उथळ असल्यानं तिथं खळखळाटच फार. पण त्यातही शिंदे सावकारांचे सुरेशराव, जमदाडे साहेब, कुंभारीच्या जाधवांचे प्रभाकरपंत यांनी गळ टाकून ठेवला होता. जाधवांनी तर आतापर्यंत केलेल्या खर्चाची हातभर यादीच खिशात ठेवली होती. शिवाय त्यांची दवंडी गावभर सुरु होती. पाहुण्यांमुळं जतचा तिढा वाढणार, पण तो सुटणारही, याची पक्की खात्री कदम साहेबांना होती. त्यांनी विश्वजितला पाठवलं. तलावावर शिंदे कंपनीला गटवण्यात आलं. (साहेबांची गाडी दिसल्यावर डफळापूरचे चव्हाण, मीनाक्षीताई, आवंढीचे कोडग आधीच तिथून सटकले होते. त्यांनी गळ काढून घेतले होते.) दुसऱ्या बाजूला जमदाडे, जाधवांनी टाकलेला गळ बरोबर लागला आणि जगतापसाहेबांचा मासा घावला! या मंडळींना मागच्या वेळी शेंडग्यांचा मोठा मासा घावला होता. त्यानंतर मुंबईच्या गोदीतनं खाद्य आलं आणि तेरा जणांनी याच तलावात स्वत:च्या ‘हाता’नं ‘कमळ’ फुलवलं.
संजयकाकांची ‘फोक्स वॅगन’ सांगलीच्या दिशेनं निघाली होती. रस्त्यात माधवनगर कॉटन मिलच्या मोकळ्या जागेत त्यांनी पप्पूशेठला गाठलं. पवारांचे दाढीवाले हणमंतरावही आले होते. काकांनी रस्त्याकडं बोट दाखवलं. गाडगीळ सराफांची गाडी चमचमत होती. पप्पूशेठ, हणमंतराव तिकडं धावले... धनपालतात्या हळूच गाडीतून बाहेर पडून चोरपावलांनी कुपवाडकडं पळताना दिसले म्हणे! मिरजेत डावरे साहेबांनी ‘हाता’वर पाणी सोडून (बाटलीबंद पाणी हं!) ‘चांगभलंऽऽ’ म्हणण्यासाठी गुलाल घेतला होता, पण साहेबांनी (कडेगावच्या की इस्लामपूरच्या?) दम भरताच त्यांनी गुलालही टाकून दिला. इस्लामपुरात अपेक्षेनुसार हिंदकेसरींच्या भीमरावनं गळ काढून घेतला. कुणी म्हणतंय, प्रतीकदादा-राजूभार्इंनी रावतेंना गप्प केलं, तर कुणी म्हणतंय, खुद्द इस्लामपूरच्या साहेबांनीच भीमरावला ‘मातोश्री’वर पाठवलं होतं आणि आता त्यांनीच वारणाकाठी गडबड नको, म्हणून त्याला थंड केलंय. महाडिक कंपनीनं आधीच हे ओळखलं होतं. त्यांनी मात्र हुशारीनं जिकडं पाणी जास्त खोल, तिकडं जायचा निर्णय घेतला.
सांगलीत दिगंबर आणि मुन्नाकडं कुणी बघितलंच नाही. साहेबांना वाटलं, मदनभाऊ बघतील आणि मदनभाऊंना वाटलं, प्रतीकदादा बघतील. पण कुणीच बघितलं नसल्यानं दोघं बसून आहेत... पाणी वाढल्यावर शिंगट्या, वाम, मरळ मासे गळाला लागतील म्हणून..!
जाता-जाता : दिनकरतात्यांनी आधी कमळाच्या तलावात आणि नंतर बारामतीच्या डोहात गळ टाकला होता. पण साहेबांनी त्यांना ‘अदखलपात्र’ ठरवलं होतं, तर संजयकाकांचं कमळ फुलवण्यात त्यांचा वाटा असल्यानं आबा चिडून होते. त्यामुळं गळाला काही लागलं नाही. अखेर बारामतीच्या डोहातलं पाणी आपल्या नाका-तोंडात जात असल्यानं डोहातून बाहेर पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आता कमळाच्या तलावाकडंच जातील. (‘हे माहीतच होतं, दरवेळेलाच असं-कसं होतं? सगळं आधीच ठरलेलं असतं...’ अशी चर्चा ‘विष्णुअण्णा भवन’वर होती!) कुणी म्हणतंय, बारामतीच्या डोहात काही गळाला लागलं नाही म्हणून दिनकरतात्या कमळाच्या तलावाकडं चाललेत... कुणी म्हणतंय, साहेबांनीच तिकडचं सोनं (दसऱ्याला लुटायचं सोनं हं!) आणायला सांगितलंय...
ताजा कलम : खंडेनवमीला म्हणे गाडगीळ सराफांची चमचमणारी गाडी सांगलीवाडीतून हळूच बाहेर पडली आणि दिनकरतात्यांनी शमीच्या झाडावरची (गंजलेली) शस्त्रं बाहेर काढली... असं सांगलीवाडीचा हरिदास सांगत होता. त्याला ‘वॉच’ ठेवायला साहेबांनीच बजावलं होतं.
- श्रीनिवास नागे

Web Title: The story of Bandoba's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.