या आजीबाईच्या हाकेने चिमण्या करतात चिवचिवाट..रोज येतात तांदूळ खायला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:37 AM2019-07-11T00:37:00+5:302019-07-11T00:37:30+5:30
त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.
सहदेव खोत ।
पुनवत : धान्यातील घातक रासायनिक घटक, सिमेंटच्या जंगलांमुळे नष्ट झालेला नैसर्गिक अधिवास, पाण्याची समस्या, यामुळे चिमण्यांच्या संख्येवर विपरित परिणाम झाला आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र परसदारी चिमण्यांना चक्क हाक मारून त्यांना खाऊ घालतात. गावचिमण्यांबरोबरच रानचिमण्याही येथे दररोज मोठ्या संख्येने जमतात.
वाढत्या नागरिकरणामुळे सर्वच पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. त्याला चिमण्याही अपवाद नाहीत. चिमणी हा तसा मनुष्यवस्तीत वावरणारा पक्षी, तर रानचिमणीचे वास्तव्य शेतात. या दोन्ही प्रकारच्या चिमण्यांची संख्या सध्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. चिमण्यांचे प्रमुख खाद्य म्हणजे धान्य, पण हे धान्यच रासायनिक खतांमुळे पूर्वीसारखे दर्जेदार राहिले नाही. शिवाय गावात चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. सिमेंटची जंगले उभी राहिली. परिणामी चिमण्यांचे तसेच अन्य पक्ष्यांचे अधिवास उद्ध्वस्त होत आले.
खवरेवाडी येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिमण्यांना परसदारी बोलावून खाऊ घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.
दररोज देतात तांदूळ
सुशिलाबाई दिवसातून चारवेळा हाती तांदूळ घेऊन चिमण्यांना ‘या गं’अशी हाक मारतात. त्यांचा आवाज ऐकताच चिमण्याही हजर होतात. यात रानचिमण्याही मोठ्या संख्येने असतात. तांदळावर ताव मारून त्या शेजारच्या झाडावर जाऊन बसतात. त्यांना ही हाक सवयीची बनली आहे. त्यामुळे त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.