रस्त्यावर वाढदिवस केला, मिळाली पोलीस कोठडी ! सांगलीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:00 PM2018-05-03T21:00:57+5:302018-05-03T21:00:57+5:30
सांगली : भरचौकात रस्त्यावरच मित्राचा वाढदिवस साजरा करुन हुल्लडबाजी व आरडाओरड करणाºया चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी रात्री अटक केली.
सांगली : भरचौकात रस्त्यावरच मित्राचा वाढदिवस साजरा करुन हुल्लडबाजी व आरडाओरड करणाºया चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी रात्री अटक केली. अनपेक्षितपणे झालेल्या या कारवाईमुळे या चारही तरुणांच्या जल्लोषावर पाणी फिरले. त्यांना संपूर्ण रात्र पोलीस कोठडीची हवा खावी लागली.
अटक केलेल्यांमध्ये इम्तियाज मेहबूब गवंडी (वय २६, भारतनगर, कोल्हापूर रस्ता), निखिल आनंद सावंत (२२, नवप्रभात चौक), विनायक गणेश मुरके (२७, सांबारे रस्ता, गावभाग, सांगली) व अनुप संजू तांबवेकर (२३, तांबवेकर गल्ली, हरिपूर, ता. मिरज) यांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी चौघांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी, रात्रीच्यावेळी रस्त्यावर हुल्लडबाजी करणाºया तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. या विभागाचे पोलीस निरीक्षक राजन माने, हवालदार मारुती साळुंखे, नीलेश कदम, सचिन कनप, राजू मुळे, संग्राम जाधव व चेतन महाजन यांचे पथक बुधवारी रात्री शहरात गस्त घालत होते. हरभट रस्त्यावरुन हे पथक टिळक चौकात आले असता, हे चारही संशयित जोरजोराने आरडाओरड करुन हुल्लडबाजी करीत होते. त्यांचे नृत्यही सुरु होते. यापैकी विनायक मुरके याचा चेहरा केकने माखलेला होता. त्यांच्या या वर्तनामुळे सार्वजनिक ठिकाणच्या शांततेचा भंग झाला होता. त्यामुळे पथकाने चौघांना ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, विनायक मुरके याचा वाढदिवस असल्याचे निष्पन्न झाले. पण हा वाढदिवस घरी साजरा न करता ते टिळक चौकात रस्त्यावरच करीत होते. वाढदिवसाच्या नावाखाली त्यांनी हुल्लडबाजी केली. केक कापून तो एकमेकांच्या चेहºयाला लावताना त्यांची जोरजोरात आरडाओरड सुरु होती. त्यांच्या या वर्तनामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली.
दुसरा दणका
दोन महिन्यांपूवी टिळक चौकालगत असणाºया गणपती मंदिराजवळ रस्त्यावरच वाढदिवस साजरा करणाºया पाचजणांना अटक केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेच ही कारवाई केली होती. बुधवारीही टिळक चौकात अशाचप्रकारची कारवाई केली. येथून पुढे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाºयांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा निरीक्षक राजन माने यांनी दिला आहे.
शहर पोलिसांचे दुर्लक्ष
शहरात रात्रीनंतर अकरानंतर खुलेआम खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे, पान दुकाने तसेच हॉटेल सुरू असतात. यातून गर्दी निर्माण होऊन वादावादीचे आणि मारामारीचे प्रकार घडत आहेत. पण शहर पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाºया मित्रांच्या टोळक्याला दोनवेळा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू असताना शहर पोलिसांना याची काहीच खबर नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.