कुपवाड एमआयडीसीतील काही भागातील पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:37+5:302021-03-21T04:24:37+5:30
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील काही भागातील पथदिवे वारंवार बंद पडत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन कामगारांची वाटमारी सुरू असून भुरट्या ...
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील काही भागातील पथदिवे वारंवार बंद पडत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन कामगारांची वाटमारी सुरू असून भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होऊ लागल्याने कामगार व उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
कुपवाड एमआयडीसीतील जकात नाका ते सावळी तलाव या मुख्य रस्त्यावरील व जे ब्लाॅकमधील तसेच इतर काही भागातील पथदिवे वारंवार बंद असतात. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अधिकारी ‘या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात’ असे उद्योजकांनी सांगितले.
रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याचा फायदा घेऊन काही भुरटे चोर रात्री कामावरून घरी जाणाऱ्या व कामावर येणाऱ्या कामगारांना रस्त्यावर अडवून पैसे व मोबाइल काढून घेतात.
तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरटे काही कारखान्यांत चोरी करीत आहेत. रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद पडतात. त्यामुळे देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च वाया जातो. याकडे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने कामगार व उद्योजकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.