विश्रामबाग उड्डाण पुलावर अखेर पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:46+5:302021-01-08T05:25:46+5:30
सांगली : विश्रामबाग रेल्वे उड्डाण पूल दीड वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला. पण या पुलावर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने किरकोळ ...
सांगली : विश्रामबाग रेल्वे उड्डाण पूल दीड वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला. पण या पुलावर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने किरकोळ अपघात वाढले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह नागरिक जागृती मंचने याबाबत पाठपुरावा केल्याने उड्डाण पुलावर पथदिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच हा उड्डाणपूल पथदिव्यांनी उजळून निघणार आहे.
विश्रामबाग ते कुपवाड या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाची मागणी होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठपुरावा करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण या पुलावर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. याबाबत नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. रात्रीच्यावेळी पुलावर अंधार असतो. दोन्ही बाजूंनी वाहने येतात. पहाटेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी पुलावर नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे मोठा अपघाताचा धोका होता.
या प्रश्नात आमदार गाडगीळ यांनी लक्ष घातले. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली. अखेर उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होऊन पथदिवे सुरू होतील, असे गाडगीळ यांनी सांगितले.
फोटो ओळी :- विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलावर पथदिवे बसविण्याचे काम गतीने सुरू आहे.