‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’; सांगली जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राबवतेय आदर्शवत उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:19 IST2025-02-08T16:18:25+5:302025-02-08T16:19:08+5:30
समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश

‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’; सांगली जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राबवतेय आदर्शवत उपक्रम
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) ग्रामपंचायतीने पुरोगामी महाराष्ट्रात एका ऐतिहासिक निर्णयातून समाज व्यवस्थेत रूढ असलेली अक्षररूपी जातीव्यवस्था मोडून एक जात व्यवस्थेला छेद देणारा निर्णय घेतलेला आहे.
सरपंच स्मिता भोसले, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी महाराष्ट्रातले वैभव, महाराष्ट्राची परंपरा व स्वराज्यातील इतिहासाचे साक्षीदार गडकोट किल्ले यांच्याप्रति जाणीव, जागृती व व्याप्ती तसेच नव्या पिढीला किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण होण्याकरिता ‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’ देऊन समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे.
नव्या पिढीला किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण होण्याकरिता गावातील जातीव्यवस्थेवर आधारित असलेल्या ‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’ देऊन फलक लावले आहेत. यातून गडकोट व किल्ल्यांविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, किल्ल्यांविषयी आत्मियता वाढावी, किल्ल्याचे बांधकाम करताना, रचना करताना जो विचार शिवाजी महाराजांचा होता, तोच दृष्टिकोन ठेवून गावातील तरुणांनी पुढील आयुष्यात प्रगती करताना या किल्ल्यांना स्मरून वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे.
येथे राबविले जाणारे विविध उपक्रम आदर्शवत ठरत आहेत. सरपंच स्मिता भोसले यांच्याकडून ‘राजमाता जिजाऊ लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत गावात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर पाच हजार रुपये ठेव ठेवली आहे.
शिरसी शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी किल्ल्यांची नावे दिली आहेत. - स्मिता भोसले, सरपंच,