रस्त्यासाठी ढवळी ग्रामस्थांचा ठिय्या
By admin | Published: December 30, 2016 11:54 PM2016-12-30T23:54:11+5:302016-12-30T23:54:11+5:30
दुरूस्तीची मागणी : आंदोलनामुळे मिरज-बेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प
मिरज/नरवाड : वड्डी-ढवळी रस्ता दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मिरज-म्हैसाळ रस्ता रोखून धरणे आंदोलन केले. यावेळी म्हैसाळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे दिले.
वड्डी ते ढवळी या चार किलोमीटर खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेतील निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर ढवळीच्या ग्रामस्थांनी यापूर्वीच बहिष्कार घातला आहे. प्रतिवर्षी ढवळीच्या नदीतून महसूल विभागाला माती, वाळूच्या माध्यमातून सात ते आठ कोटी रुपये उत्पन्न मिळते. शासन पैैसे घ्यायला तयार आहे, मात्र रस्त्यावर पैसे खर्च करायला तयार नसल्याने, ग्रामस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही केली आहे. शासनाने मात्र ग्रामस्थांचा विरोध झुगारून वाळूचे ठेके देण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
याच्या निषेधार्थ ढवळीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. मिरज ते बेळगाव (कर्नाटक) हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरण्यात आला होता. वाळूचा ठेका बंद झाला पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.
रस्ता दुरूस्तीसाठी कोणीही दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी मिरज-म्हैसाळ रस्ता रोखून धरला. यामध्ये शिवसेना, भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. एक तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होती. आंदोलनात वाळू ठेका बंद करण्याच्या मागणीसाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली केल्याबद्दल आंदोलकांनी शासनाचा धिक्कार केला.
आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार शेखर परब यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या सह्णांचे निवेदन स्वीकारले. रस्ता दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये खर्चाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी २८ डिसेंबरला जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. प्रशासनाकडून लवकरच रस्त्याचे काम सुरू करू, असे आश्वासन सरपंच अश्विनी पाटील व शिवसेनेचे तानाजी सातपुते, पृथ्वीराज पवार, सुवर्णा मोहिते, गजानन मोरे, नागेश पाटील, आर. आर. पाटील, विशाल रजपूत यांच्यासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, राजू मोरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)