वाचन कट्टा उपक्रमातून वाचन चळवळ सशक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:33+5:302021-02-05T07:17:33+5:30
भिलवडी : वाचन कट्टा या उपक्रमातून वाचन चळवळ सशक्त होईल, असे प्रतिपादन भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे ...
भिलवडी : वाचन कट्टा या उपक्रमातून वाचन चळवळ सशक्त होईल, असे प्रतिपादन भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी (ता. पलूस) येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित वाचन कट्ट्यावर ‘माझे आईविषयीचे वाचन’ या विषयावर चर्चा रंगल्या. गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम झाला. वाचनालयाचे माजी अध्यक्ष दिवंगत काकासाहेब चितळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर महिन्यात सहभागी वाचकांना एक विषय दिला जातो. त्या विषयाशी संबंधित पुस्तकांचे वाचन करून पुढील महिन्यातील वाचन कट्ट्यावर सारांशरुपी विचार सादर करावयाचे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. त्यास वाचक व सभासदांकडून प्रतिसाद मिळत आहे.
चितळे यांनी यावेळी वाचनालयास ग्रंथ भेट दिले. सुभाष कवडे यांनी साने गुरुजी, मॅक्झीम गार्की यांच्या आईबद्दल आठवणी सांगितल्या. संदीप नाझरे यांनी कविता सादर केली. शरद जाधव यांनी मदर तेरेसा यांच्या आईने केलेल्या संस्कारांविषयी विविध गोष्टींचे कथन केले. निवृत्त न्यायाधीश जगन्नाथ माळी, भू. ना. मगदूम, आरती बाबर, डी. आर. कदम, संजय पाटील, जी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो -भिलवडी येथे गिरीश चितळे यांच्याकडून पुस्तक भेट स्वीकारताना जी. जी. पाटील, शेजारी सुभाष कवडे, डी. आर. कदम आदी.