स्पर्धा परीक्षांच्या विश्वात वाचन संस्कृतीला मिळतंय बळ
By admin | Published: April 22, 2016 11:00 PM2016-04-22T23:00:17+5:302016-04-23T00:56:39+5:30
पुस्तकांच्या विक्रीत चढ-उतार : तरुणाईच्या मोबाईल वेडामुळे वाचन सवयीचा आलेख घटल्याचे चित्र
शरद जाधव -- सांगली --कालानुरुप पुस्तकांची विक्री कमी-अधिक झाली असली तरी, पुस्तकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. आजकाल मोबाईलमध्ये रमणाऱ्या पिढीकडून पुस्तक वाचण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी जाणकार करीत असतात. मात्र, स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालल्याने, परीक्षेपुरत्या सीमित स्वरुपात का होईना, वाचन संस्कृती वाढत आहे.
शनिवारी, २३ एप्रिलला जगभर साजऱ्या होत असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील पुस्तकांचा आणि वाचकांचा आढावा घेतला असता, काही प्रमाणात सकारात्मक चित्र पाहावयास मिळाले. तरुणांकडून मर्यादित स्वरुपात का होईना, पुस्तके वाचली जात आहेत.
आजची तरुणाई सोशल मीडियाच्या विळख्यात अडकून पडल्याची तक्रार होत असतेच. त्यात काही प्रमाणात तथ्यही दिसून येते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास करणाऱ्या घोकंपट्टी वाचनाला आता प्राधान्य मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्रच दिसते. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी, जीवन घडविणाऱ्या अनेक गोष्टी मात्र दूर झाल्या आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पुस्तक वाचन होय.
शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांशी परिचय नसणाऱ्यांना त्याचे अप्रूप नसतेच, असा एक गैरसमज दूर होत आहे. वाचता येईल इतकेच शिक्षण घेतलेल्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन होत असल्याचा आशादायी निष्कर्ष ग्रंथपालांनी व्यक्त केला.
सध्या स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांकडून अभ्यासविषयक का असेना, मात्र पुस्तकांचा अक्षरश: फडशा पाडला जात आहे. मुळात गेल्या पाच वर्षापासून राज्य सेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षांचे स्वरूपही बदलल्याने, विद्यार्थ्यांना अधिक प्रगल्भ करण्याचा हेतू असल्याने, परीक्षार्थींनाही एकाच विषयावरील अनेक पुस्तके वाचावी लागत आहेत. त्यामुळे आपोआपच वाचन संस्कृती जोपासली जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकेच यशस्वी ठरत असल्याचा एकंदर ‘ट्रेंड’ दिसून आला. मराठीतील वाचनीय पुस्तकांबरोबरच नवीन येणाऱ्या पुस्तकांचेही वाचकांकडून स्वागतच होत आहे. मात्र, त्यातही अनुवादित पुस्तकांनाच जास्त प्रतिसाद आहे.
तरुण वर्ग वाचत नाही असे नाही, तर जे वाचत आहे, ते अभ्यास करुन वाचायला हवे. सोशल मीडियावर व्यक्त होणारी मते ही देशविघातक ठरु शकतात. त्यामुळे वाचन करुन त्याच्यावर निष्कर्ष काढून मत बनविले पाहिजे. वाचनीयता वाढली तरच संस्कृती रुजते, हा इतिहास असल्याने याकडे लक्ष वेधले गेले पाहिजे. सध्या शांतिनिकेतन ग्रंथालयाने राबविलेला उपक्रम अनुकरणीय आहे.
- प्रा. डॉ. भीमराव पाटील, साहित्यिक
पुस्तके आवर्जून वाचा...
पुस्तकांच्या विक्रीचा घेतलेला आढावा मात्र तितकासा आशादायी नक्कीच नव्हता. ग्रंथालयाच्या माध्यमातून अथवा उपलब्ध झालेली पुस्तके वाचनाकडे ओढा वाढला असला तरी, पुस्तके विकत घेऊन वाचण्याकडे कल वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाचनीयता वाढविण्यापेक्षा ती पुस्तके विकत घेऊन वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा मानस विक्रेत्यांनी व ग्रंथप्रेमींनी व्यक्त केला.