कोरोना संशयितांची संख्या वाढत असल्याने मिरज प्रयोगशाळेवर पुन्हा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:14+5:302021-03-18T04:25:14+5:30
मिरजेतील जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रूग्णांच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यांत येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर ...
मिरजेतील जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रूग्णांच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यांत येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख नमुने तपासण्यात आले आहेत. मिरज प्रयोगशाळेत १ मेपर्यंत सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या चार जिल्ह्यातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. कोल्हापूर व रत्नागिरीत प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर मिरज प्रयोगशाळेवरील ताण कमी झाला. मात्र गत जून महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णांची व संशयितांची संख्या वाढत गेल्याने दररोज हजार नमुन्यांची तपासणी करण्यांत आली. या प्रयोगशाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाला तोंड द्यावे लागले. नमुन्यांची संख्या वाढल्याने सिव्हिल प्रयोगशाळेत पॅथाॅलाॅजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी व जिल्हा परिषद आरोग्य सहाय्यकांचीही मदत घेण्यात आली. डिसेंबरपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने प्रयोगशाळेवरील ताण कमी झाला. जानेवारीपासून दररोज केवळ दोनशे नमुने तपासणीसाठी येत होते. मात्र फेब्रुवारीअखेर रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता दररोज पाचशे नमुने तपासणीसाठी येत आहेत. दैनंदिन तपासणीची संख्या वाढली असतांनाच राज्यसेवा परीक्षेसाठी आरटीपीसीआर तपासणी आवश्यक करण्यांत आल्याने मिरज सिव्हिल प्रयोगशाळेत गेल्या चार दिवसात हजारो नमुने तपासणीसाठी येत आहेत. राज्य सेवा परीक्षा देणारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पर्यवेक्षक अशा सुमारे दहा हजार जणांची तपासणी करावी लागणार असल्याने प्रयोगशाळेत २४ तास काम सुरू आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी रियल टाइम पीसीआर ही दोनच उपकरणे असल्याने तपासणीची गती संथ आहे. यामुळे नमुन्यांचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. जिल्ह्यातील नमुन्यांची संख्या वाढत असून या संख्येत यापुढे आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने सिव्हिल प्रशासनाने जिल्हा परिषदेतील आरोग्य सहाय्यकांची मिरज कोविड प्रयोगशाळेत नियुक्ती केली आहे.