गणेशोत्सव,मोहरमच्या पार्श्वभूमीवर डॉल्बीचा वापर केल्यास कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:50 AM2019-07-24T11:50:10+5:302019-07-24T11:52:05+5:30
कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला.
मिरज : कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला.
आगामी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर मिरजेत महापालिका सभागृहात शांतता समिती सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि विविध संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपअधीक्षक गील बोलत होते. महापौर संगीता खोत, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, प्रभाग समिती सभापती गायत्री कुल्लोळी आदी उपस्थित होते.
उपअधीक्षक गील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाºया डॉल्बी ध्वनियंत्रणेला परवानगी देण्यात येणार नाही. एक बेस-एक टॉपला प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, कायद्याच्या कक्षेबाहेर मंडळांनी कोणतीही मागणी करू नये. गणेशमूर्तीची उंची मर्यादित असावी. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी पुढाकार घेऊन गणेश मंडळांच्या मदतीने जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे बांधले. यावर्षीही मंडळांनी अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्ते दुरुस्त करावेत, एक खिडकी योजना सुरु करून परवाने द्यावेत, रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी द्यावी, स्वच्छता ठेवावी अशा सूचना केल्या.
सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, नगरसेवक निरंजन आवटी, गणेश माळी, पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने, बाबासाहेब आळतेकर, जैलाब शेख, गजेंद्र कुल्लोळी, शकील पिरजादे, अशोक कांबळे, असगर शरिकमसलत, अनिल रसाळ, मुस्तफा बुजरूक, जावेद पटेल, सचिन गाडवे धनराज सातपुते, जयगोंडा कोरे, सचिन चौगुले, तानाजी घार्गे, महावितरण व महापालिका अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.