निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आता कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:45+5:302021-04-22T04:27:45+5:30
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आणखी वाढ करण्यात येणार असून जनतेच्या ...
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आणखी वाढ करण्यात येणार असून जनतेच्या सुरक्षेसाठीच नियम करण्यात आले आहेत. यापूर्वी निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या प्रबोधनावर पोलिसांनी भर दिला होता. आता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री देसाई सांगलीत आले होते. यावेळी बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात संचारबंदीची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पाेलीस दलाकडे मनुष्यबळ कमी असतानाही जादा होमगार्ड्सना सेवेत घेऊन नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
निर्बंधांची अंमलबजावणी करताना नागरिकांवर कारवाई न करता त्यांना समजावून सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही. विनाकारण आणि क्षुल्लक कारणांसाठी अनेकजण बाहेर फिरतच असून त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आता नियमभंग केल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. आणखी काही कडक नियम आले तरीही संसर्ग रोखण्यासाठीच ते असल्याने त्याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी करणार
कोरोनाविषयक अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगत देसाई म्हणाले की, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी कोरोनाविषयक केलेल्या वक्तव्याची क्लीप तपासून पुढील निर्णय घेऊ. समाजाला दिशाभूल करणारे, भडकावणारे वक्तव्य असलेतर निश्चितच कारवाई केली जाईल.
चौकट
रेमडेसिविरचा साठा करू नका
राज्यात ऑक्सिजनसह रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच सर्व परिस्थिती सुरळीत होणार आहे. मात्र, रेमडेसिविरच्या साठेबाजांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून काेण कितीही मोठा असूदे इंजेक्शनचा साठा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. असेही गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.