नियम भंग केल्यास आता कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:55+5:302021-05-05T04:45:55+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अनेकांना या परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नाही. आतापर्यंत पोलिसांकडून कारवाई करताना सामंजस्याची भूमिका ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अनेकांना या परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नाही. आतापर्यंत पोलिसांकडून कारवाई करताना सामंजस्याची भूमिका घेण्यात येत होती; मात्र नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत, त्यामुळे यापुढे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिला.
अधीक्षक गेडाम म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही अनेक जण विनाकारण बाहेर फिरत आहेत. पोलिसांकडून सहकार्याची भूमिका असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजाराची गंभीर दखल घेतली असून, यातील आणखी कोणी सूत्रधार असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास थेट तक्रार करावी.
जिल्ह्यात ५३ ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरात ११ हजार ९४० दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४० लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३ हजार ५९० चारचाकी वाहनांकडून १० लाख ८९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या ३५५७ जणांकडून १६ लाख २५ हजारांचा दंड करण्यात येत असल्याचेही गेडाम यांनी सांगितले.
चाैकट
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
अधीक्षक गेडाम म्हणाले की, आज, बुधवारपासून आठ दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांनीही विनाकारण बाहेर फिरू नये.