कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रसंगी कठाेर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:39+5:302021-03-18T04:25:39+5:30
सांगली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यात तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. तरीही गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ ...
सांगली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यात तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. तरीही गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ होत आहे. जनतेनेही नियमांचे पालन करावे, नाही तर संसर्ग रोखण्यासाठी प्रसंगी कठाेर निर्णय घ्यावे लागतील, असे आवाहन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी केलेे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमहापौर उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी. सध्या कोणतेही निर्बंध लागू करण्याविषयी विचार नाही. आठवडा बाजारातील गर्दी कमी करण्याचे नियोजन करावे. वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णास शिक्का मारावा व त्याच्या घराबाहेर फलक लावण्याचेही नियोजन केल्यास तो व्यक्ती बाहेर पडणार नाही.
चौकट
जिल्ह्यातील लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांनी यास प्रतिसाद दिला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे. याबाबतचे गैरसमज दूर करून प्रशासनाने लसीकरण वाढविण्यासाठी मोहीम राबविण्याच्याही सूचना डॉ. कदम यांनी दिल्या.