सांगलीत नियमांची कडक अंमलबजावणीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:13+5:302021-05-15T04:26:13+5:30
सांगलीत बाजारपेठेत मोकाट जनावरांचा ठिय्या सांगली : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतूक ...
सांगलीत बाजारपेठेत मोकाट जनावरांचा ठिय्या
सांगली : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. पादचारी नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सांगली शहरातील सूचनाफलक गायब
सांगली : शहराला जोडणाऱ्या अनेक मार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. सूचना फलकांअभावी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु, अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असून, गर्दीही केली जात आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन
सांगली : कॉलेज कॉर्नर येथील मुख्य रस्त्यावरच काहींनी व्यवसाय थाटले आहेत. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरच वाहने नो पार्किंगमध्ये लावून दुरुस्तीही केली जात आहे. तरीही वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.