कडेगावच्या १५ गावांत आजपासून कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:33+5:302021-07-18T04:19:33+5:30
तालुक्यातील कोरोनास्थितीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर तालुका प्रशासनाने येथे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तालुक्यातील वांगी येथे सध्या ७७ सक्रिय ...
तालुक्यातील कोरोनास्थितीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर तालुका प्रशासनाने येथे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तालुक्यातील वांगी येथे सध्या ७७ सक्रिय रुग्ण आहेत, तर सोनकिरेत ७२, कडेगाव शहर ६६, नेवरी ६४, चिंचणी ५८, हिंगणगाव बुद्रुक ५०, देवराष्ट्रे ४८, वडिये रायबाग ४७, ढाणेवाडी ४२, शेळकबाव ३६, सोनसळ ३५, तडसर ३१, मोहिते वडगाव २६, कडेपूर २३, उपाळे मायणी २३ रुग्ण रुग्णालय, कोरोना केअर सेंटर किंवा विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. या १५ गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पुढील आदेश येईपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तेथे जास्तीत जास्त चाचण्या आणि गावातील शाळांमध्ये विलगीकरणही करण्यात येणार आहे.
तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत वरील १५ गावांमध्ये रुग्णसंख्या जास्तच असल्याने व तेथे दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. आता मात्र प्रशासनाने या गावांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड व तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी या गावांना भेटी दिल्या. यावेळी नियमभंग करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायतींनी गावातील शाळांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
चौकट
...असा असेल लॉकडाऊन
कडेगाव तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असलेल्या १५ गावांत फक्त रुग्णालये, औषधी दुकाने, दूध संकलन, अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगीशिवाय घेता येणार नाही. पॉझिटिव्ह रुग्णांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे. विनामास्क फिरणारे, चौकात, पारावर विनाकारण बसणारे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.