कठोर निर्बंध केवळ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:57+5:302021-03-18T04:24:57+5:30
सांगली : लग्नसमारंभ, अंत्यविधी, सिनेमागृह, बाजार अशा सर्व ठिकाणी शासनाने कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही जिल्ह्यात या निर्बंधांना ठेंगा दाखविला ...
सांगली : लग्नसमारंभ, अंत्यविधी, सिनेमागृह, बाजार अशा सर्व ठिकाणी शासनाने कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही जिल्ह्यात या निर्बंधांना ठेंगा दाखविला जात आहे. विनामास्क, सुरक्षित अंतराविना कोरोनाचा प्रसार करण्याचे काम सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नित्यनियमाने सुरू आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लागू केले. १६ मार्चपासून हे नियम लागू झाले असले तरी, या नियमांना कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. कार्यक्रमांची भाऊगर्दी, गर्दीतला नियमांचा बाजार, बाजारातून होणारा प्रसार असा कार्यक्रम जिल्ह्यात सुरू असल्याने गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे.
चौकट
पहिल्या दिवशी कारवाई नाही
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातल्यानंतर पहिल्या दिवशी जिल्ह्यात पोलीस किंवा प्रशासनाकडून एकही कारवाई झाली नाही. दुसरीकडे या नियमांचे सर्रास उल्लंघन दररोज होत आहे. त्यामुळे कारवाईच्या पातळीवर उदासीनता आहे.
चौकट
सिनेमागृह
सिनेमागृहांमध्ये सध्या पन्नास टक्के नियमांचे पालन होत असल्याचे दिसून आले. नाटकांसाठीही हाच नियम असल्याने त्याठिकाणीही पालन केले जात आहे. मात्र अनेक हॉटेल्समध्ये या नियमांना हरताळ फासण्यात आल्याचे दिसून आले.
विवाह समारंभ
विवाह समारंभात सर्वाधिक नियमांचे उल्लंघन होत आहे. हजारो लोक लग्नात एकत्र येत आहेत. मंगळवारी, बुधवारी लग्नमुहूर्त नसले तरी, आठवडाभरात हे नियम अनेक लग्नात मोडले आहेत.
अंत्यविधी
सांगलीच्या अमरधाम व अन्य स्मशानभूमीत नियमांना हरताळ फासून गर्दी होत आहे. बुधवारी एका अंत्यविधीला शंभरहून अधिक लोक दिसून आले.
आठवडा बाजार
शहरातील आठवडा बाजारात गर्दी दिसून आली. सुरक्षित अंतराच्या नियमांचाच बाजार संजयनगर परिसरातील बाजारात दिसून आला.
गृह विलगीकरण
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घराबाहेर कुठेही फलक लावलेला नाही. याबाबतही प्रशासकीय स्तरावर उदासीनता दिसून आली.