कडक निर्बंध कागदावर, कोरोना मानगुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:19 AM2021-07-15T04:19:20+5:302021-07-15T04:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बुधवारपासून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले; पण हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बुधवारपासून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले; पण हे निर्बंधही कागदावरच असल्याचे चित्र शहरात दिसत होते. कडक निर्बंध असतानाही रस्त्यांवरील गर्दी मात्र हटलेली नव्हती. मुख्य बाजारपेठेसह भाजी मंडई, किराणा व बेकरीत मोठी गर्दी होती. केवळ खाद्यपदार्थांचे हातगाडे व फळ, भाजी विक्रेते मात्र रस्त्यांवरून गायब होते.
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. यात रस्त्यावरील फळ, भाजीसह सर्वच साहित्यविक्री बंद करण्यात आली. खुली मैदाने, माॅर्निंग वाॅकवर बंदी घातली. किराणा दुकानांना साहित्य घरपोच करण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी त्याचा फारसा परिणाम झाल्याचे कुठेच दिसत नव्हते.
शहरातील रस्त्यँवर दिवसभर मोठी गर्दी होती. मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे शटरच केवळ बंद होते. दुकानांबाहेर व्यापारी व कामगार दिवसभर थांबून होते. ग्राहक येताच शटर उघडून त्यांना आत घेतले जात होते. रस्त्यावरील भाजी व फळविक्री बंद असल्याने भाजीमंडईत गर्दी होती. त्यातही हातगाडी चालकांनी गल्लीबोळांत गाडे उभे केले होते. बेकरीच्या दुकानासमोर तर झुंबड उडाली होती. त्यामुळे निर्बंध कागदावर राहिले असून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच सुस्त झाली आहे.
चौकट
महापालिकेचे पथक सक्रिय
जिल्ह्यासह शहरात कडक निर्बंध लागू केल्यानंतर महापालिकेचे पथक सक्रिय झाले. साहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटेपासून भाजी व फळविक्रेत्यांना रस्त्यांवर विक्री करण्यास मनाई केली. तसेच मुख्य बाजारपेठेत फिरून लोकांना आवाहनही केले. तरीही बाजारपेठेसह भाजी मंडईत गर्दी दिसत होती. कडक अंमलबजावणी करण्यात महापालिकेनेही हात आखडता घेतला होता.
चौकट
कोण अडविणार?
कडक निर्बंध लागू असतानाही दिवसभर रस्त्यांवर मोठी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरू होती. कुठेच फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. वाहनचालकांना अडवून त्यांची तपासणीही होत नव्हती. ‘आम्हाला कोण अडविणार?’ अशा आविर्भावात नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.